चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

‘जगण्याच्या आनंदी वाटा’हास्यरसात श्रोते तल्लीन

Spread the love

शिवशंभो व्याख्यानमाला – अंतिम पुष्प

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवशंभो फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री महोत्सव २०२५ अंतर्गत तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत ‘जगण्याच्या आनंदी वाटा’ या विषयावरील अंतिम पुष्प ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी चिंचवड येथे गुंफले.

ज्येष्ठ उद्योजक भगवान पठारे, कुशल पाटील, कामगारनेते विलास सपकाळ, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर फड, राजीव राऊत आणि शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे यांची याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

फाउंडेशनचे सचिव राजेश हजारे यांनी प्रास्ताविकातून, ‘२००३ पासून शिवशंभो व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. समाजप्रबोधन करीत असताना मानवी जीवनातील हास्यरसाचे महत्त्व ओळखून प्रतिवर्षी हास्यविनोदाचा परिपोष करणारे किमान एकतरी व्याख्यान आवर्जून आयोजित केले जाते!’ अशी माहिती दिली. विलास सपकाळ यांनी, ‘पिंपरी – चिंचवड औद्योगिकनगरी म्हणून विकसित झाली असलीतरी या नगरीचा सांस्कृतिक दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांमध्ये शिवशंभो फाउंडेशनचे योगदान खूप मोठे आहे!’ असे मत व्यक्त केले. भगवान पठारे यांनी, ‘शून्यातून विश्व कसे निर्माण होते, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे शिवशंभो फाउंडेशननिर्मित शिवमंदिर आणि अन्य सामाजिक उपक्रम आहेत!’ असे गौरवोद्गार काढले.

डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या मार्मिक अन् उपरोधिक शैलीतून किस्से, विनोद यांची पखरण करीत माणसांच्या दैनंदिन जीवनातील विसंगतींवर भाष्य करताना श्रोत्यांना खळखळून हसवले. डॉ. संजय कळमकर म्हणाले, ‘कोरोनानंतर मिळालेले आयुष्य म्हणजे बोनस आहे, अशा समजुतीतून भारतीय माणूस हा गंभीर चेहरा करून जगत असतो. आधार कार्डवरील फोटो पाहून लग्न ठरविण्याची पद्धत असती तर कोणाचेही लग्न होणे दुरापास्त झाले असते. जगातील आनंदी देशांचे सर्वेक्षण केले असता १४२ देशांमधून भारत हा १२६ क्रमांकावर होता; आणि गमतीचा भाग म्हणजे पाकिस्तानसारखे विपन्नावस्थेतील देश भारतापेक्षा जास्त आनंदी आहेत, असे निष्पन्न त्यातून निघाले. वास्तविक जगताना प्रत्येकाच्या वाट्याला दु:ख येते; पण त्याचा किती बाऊ करायचा हे आपणच ठरवायचे असते. भारतीय माणसाला आपले दु:ख साजरे करायला खूप आवडते. आपल्या मनात आनंद असेल तर सगळे जग आपल्याला आनंदी भासते. त्यामुळेच सकारात्मक जगून जेवढा आनंद तुम्ही वाटाल, तेवढा आनंद तुमच्याही वाट्याला येईल. त्यासाठीच मृत्यूचा पूर्णविराम येण्याच्या आत आपल्या जगण्याचे वाक्य सुंदर करा!’

कैलास पोखरकर, नाना गिरण, शर्मा, अनिल पाटील, रंगराव चव्हाण, संतोष खेडकर, भारत शिंदे, यश घोळवे, आशुतोष तोरखडे, प्रतीक वाघोले यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका हजारे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button