नागरिकांनी देशाचे डोळे आणि कान बनावे! – हेमंत महाजन


शिवशंभो व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘नागरिकांनी देशाचे डोळे आणि कान बनावे!’ असे आवाहन सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी शिवशंभो मंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे व्यक्त केले.

शिवशंभो फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री महोत्सव २०२५ अंतर्गत तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत ‘भारतापुढील संरक्षणाची आव्हाने’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना हेमंत महाजन बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक बजरंग गडदे, व्याख्याते राजेंद्र घावटे, कामगारनेते सुजीत साळुंखे, भास्कर रिकामे, सदाशिव पाटील, साहेबअण्णा गोविंदे, रामदास जाधव आणि शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
केशव घोळवे यांनी प्रास्ताविकातून, ”जेथे शुद्ध आचार, विचार आणि कृती, तेथे देवाची प्रचिती’ हे ब्रीद घेऊन शिवशंभो फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे!’ अशी माहिती दिली. राजेंद्र घावटे यांनी, ‘प्रलोभनाच्या काळात प्रबोधन खूप अवघड असले तरी त्यासाठी व्याख्यानमाला हे अतिशय प्रभावी माध्यम आहे!’ असे मत व्यक्त केले.
हेमंत महाजन पुढे म्हणाले की, ‘देशापुढे बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा अशी दोन आव्हाने आहेत. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश हे आपले प्रमुख शत्रू आहेत. माओवाद, नक्षलवाद हे चीनने भारताविरुद्ध चालवलेले छुपे युद्ध आहे. आर्थिक घुसखोरी हे चीनचे धोरण आहे. भारतीयांना लागलेली स्वस्त चिनी मालाची सवय, चिनी बनावटीचे मोबाइल आणि गॅझेट्स यामुळे मोठ्या प्रमाणावर माहितीची चोरी होते. त्यासाठी चिनी मालावर बहिष्कार हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जगात कोठेही दहशतवादी हल्ला झाला तर त्यात पाकिस्तानचा हात असतो. मात्र याच दहशतवादामुळे पाकिस्तान रसातळाला गेला असून समोरासमोर लढायची त्याची ताकद राहिलेली नाही; तरीही सीमेपलीकडून ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तान भारतात ड्रग्ज पाठवत असतो. बांगलादेशात राजकीय अस्थैर्य वाढल्याने बांगलादेशी घुसखोर हा आपल्या देशाला झालेला कर्करोग आहे. त्यासाठी पोलिसांची संख्या वाढविणे, दहशतवादातील खटल्यात जलद न्यायव्यवस्था आणि राजकीय इच्छाशक्ती या गोष्टींनी बाह्य सुरक्षा सक्षम करता येईल. देशद्रोही स्वयंसेवी संस्था, डाव्या विचारसरणीच्या संस्था, विकासविरोधी आंदोलनजीवी या घटकांमुळे अंतर्गत सुरक्षेचे मोठे आव्हान देशापुढे आहे. यावर मी नागरिक म्हणून देशासाठी काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने अंतर्मुख होऊन स्वतःला विचारला पाहिजे आणि कृतिशील झाले पाहिजे!’ असे आवाहन महाजन यांनी केले.
राजेश हजारे, संतोष रांजणे, विकास शेवाळे, हणमंत जाधव, सार्थक भुसे, तेजस साकोरे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.










