ॲड. हरि शंकर जैन, ॲड. विष्णू शंकर जैन, मीरा कडबे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार जाहीर!


– स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे आज पुरस्कार वितरण
– पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष उपस्थिती


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी- प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी धर्मरक्षण, राष्ट्रहित, सेवा व शौर्य या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन मंडळातर्फे गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे १७ वे वर्ष असून, या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण आकुर्डीतील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आज 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात येणार आहे. मंडळातर्फे यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार उत्तरप्रदेश मधील सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड. हरि शंकर जैन, ॲड. विष्णु शंकर जैन यांना जाहीर करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर येथील हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ. कडबे यांना देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील जेष्ठ विधिज्ञ, पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन धर्मरक्षण, राष्ट्रहित, सेवा व शौर्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन मंडळातर्फे गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे १७ वे वर्ष आहे.
– विश्वनाथन नायर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ










