ताज्या घडामोडीपिंपरी

उन्नती सोशल फाऊंडेशनने शिवजयंतीच्या औचित्याने ०६ दिव्यांग वधू-वरांची सुखी संसाराची स्वप्ने सजवली

झुंज दिव्यांग संस्थाच्या साथीने संयुक्त उपक्रम

Spread the love

पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या , उन्नती सोशल फाऊंडेशन आणि दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या झुंज दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ०६ दिव्यांग वधू-वरांच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळा लिनिअर गार्डन गोविंद यशोदा चौक , पिंपळे सौदागर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदाचे या विवाह सोहळ्याचे २ रे वर्ष होते.

या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात , चि. जनार्दन पिराजी कोकाटे आणि चि.सौ.कां. अलका यादव वाळके , चि. मनोहर पांडुरंग गायकर आणि चि.सौ.कां. सोनाली वाल्मीक रसाळ , चि. अक्षय प्रभाकर शिंदे आणि चि.सौ.कां. मीनाक्षी पांडुरंग परदेशी , चि. लक्ष्मण धनाराम तुंगारिया आणि चि.सौ.कां. मंदाकिनी वसंत गवळी , चि. चंद्रकांत कृष्णा मोरे आणि चि.सौ.कां. स्वरांजली आनंदराव पवळे , चि. दीपक दशरथ सकपाळ आणि चि.सौ.कां. गीतांजली हिरालाल पवार या नियोजित वधू-वरांचा शुभविवाह सोहळा संपन्न झाला.

या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “आजचा हा मंगल प्रसंग केवळ दोन हृदयांच्या मिलनाचा नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी क्षण आहे. हा दिव्यांग वधू-वर सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे प्रेम, समर्पण आणि सामाजिक समतेचा एकप्रकारे सुंदर उत्सव आहे. दिव्यांग बांधवांसाठी जिद्द, आत्मविश्वास आणि परस्पर प्रेम हेच त्यांचे खरे सामर्थ्य आहे. नववधूवरांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना, आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की समाज म्हणून आपली जबाबदारी केवळ सहानुभूती दाखवण्याची नाही, तर दिव्यांग बांधवांना समान संधी निर्माण करण्याची आहे.”

झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे म्हणाले , “गेली अनेक वर्षे आम्ही दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत आहोत , दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रे काढून देणे. त्यांना सरकारी योजनांच्या मार्फत विविध सहाय्यकारी उपकरणे मिळवून देणे असे उपक्रम आम्ही राबवत असताना , उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे यांच्या माध्यमातून दिव्यांग वधू-वरांच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यांची कल्पना सुचली. उन्नती सोशल फाऊंडेशनने या उपक्रमाला सहकार्य केले , आर्थिक पाठबळ दिले. उन्नती प्रमाणेच शहरातील विविध दानशूर घटकांनी विविध रुपात आर्थिक साहाय्य करीत उपक्रम यशस्वी केला त्याबद्दल त्यांचे देखील मनःपूर्वक आभार.!”

या विवाहसोहळ्यासाठी , भाजप कार्याध्यक्ष पिं. चिं. शहर शत्रुघ्न (बाप्पू) काटे , नगरसेविका निर्मलाताई कुटे,नगरसेवक सिद्धेश्वर बारणे , पिंपळे सौदागरचे पोलीस पाटील भानुदास काटे-पाटील, उन्नती सोशल फाऊंडेशन चे संस्थापक संजय (आबा) भिसे, विजय भिसे, संदीप काटे, राहुल काटे, जगन्नाथ (आप्पा) काटे, मल्हारी कुटे,अतुल पाटील,राजू शेलार शंकर चोंधे, समाजप्रभोधनकारक शारदा मुंडे,रश्मी मोरे यांच्यासह विठ्ठल भजनी मंडळ , संत ज्ञानेश्वर मंडळ , ब्राम्हण समाज , विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लबचे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशन चे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर मधील सर्व सोसायटी चेअरमन ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक बंधू-भगिनी,उन्नती सखी मंच सर्व महिला सदस्या आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button