शहरातील सर्व साहित्य संस्थांनी एकजुटीने काम करावे – कवी अनिल दीक्षित


पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीच्या लेकींचा मंच या संस्थेच्या वतीने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंती निमित्त पिंपळे गुरव येथील शब्दधन काव्यमंच या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या संस्थेचा विशेष सन्मान संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सागर आंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. शब्दधनच्या बोधचिन्हाचे शर्ट सदस्यांना देण्यात आले.



कार्यक्रमाची सुरुवात शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ‘ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ” या अभंगाने केली.i
प्रमुख पाहुणे कवी अनिल दीक्षित होते.
सावित्रीच्या लेकींचा मंचाच्या अध्यक्ष रविना आंगोळकर , राधाबाई वाघमारे, आय के शेख,जयश्री गुमास्ते, सूर्यकांत कुरुलकर, मुरलीधर दळवी,प्रकाश घोरपडे, फुलवती जगताप, स्टेला गायकवाड,रुपाली चौधरी, श्रुतिका ढोबळे हे मान्यवर
उपस्थित होते.
अनिल दीक्षित यावेळी म्हणाले.. “पिंपरी चिंचवड शहरात अनेक साहित्य संस्था साहित्यसेवा करीत आहेत. त्यामुळे निश्चित साहित्य संवर्धन होत आहे. पिंपळे गुरव मध्ये सन २००० साली स्थापन झालेल्या शब्दधन काव्यमंचाने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेने साहित्यात वेगवेगळे प्रयोग करून अनेक ऐतिहासिक कवीसंमेलने यशस्वी केली आहेत. नवकवींना मुक्त व्यासपीठ देण्याचे काम ‘छावा काव्य पुरस्कार ‘ देऊन केले आहे. खरेतर साहित्य आणखी समृद्ध व्हावे म्हणून शहरातील सर्वच साहित्य संस्थांनी यापुढे एकजुटीने काम करावे”.

सामाजिक कार्यकर्ते सागर आंगोळकर म्हणाले- “शब्दधन काव्यमंच या संस्थेच्या एका साहित्यिक उपक्रमात मी सहभाग घेतला होता आणि त्यावेळी पहिल्यांदा मी जाहीर मनोगत व्यक्त केले होते. मला बोलते करण्यात अन् कृतिशील करण्यात शब्दधन काव्यमंचाचा मोलाचा वाटा आहे.”
सावित्रीच्या लेकींचा मंचच्या अध्यक्ष रवीना आंगोळकर प्रास्ताविक करताना म्हणाल्या, “स्रीशक्तीचा जागर करण्यासाठी संस्था काम करते. वटपौर्णिमेला विधवा महिलांच्या हस्ते वडाची झाडे प्रतिवर्षी संस्थेच्या वतीने लावली जातात. यावर्षी शब्दधनचा रौप्यमहोत्सव असल्यामुळे या संस्थेचा सन्मान करताना विशेष आनंद होत आहे.”
तानाजी एकोंडे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले .








