जागतिक रेडिओ दिनानिमित्त ‘नागझिरा’ अभिवाचन ‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ चा उपक्रम


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १३ फेब्रुवारी या जागतिक रेडिओ दिनानिमित्त साधून ‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ च्या वतीने निगडी, प्राधिकरण येथील वीर सावरकर उद्यानात ‘आदिम’ प्रस्तुत व्यंकटेश माडगूळकर लिखित ‘नागझिरा’ या निसर्गवर्णनाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.



यावेळी देवराई फाऊंडेशनचे संस्थापक आणि पीसीएमसी स्मार्ट सिटी कमिटीचे सदस्य धनंजय शेडबळे, पीसीईटी च्या मीडिया अँड ब्रँडिंग विभागाचे प्रमुख डॉ. केतन देसले, प्रा. आनंद बिराजदार, डेक्कन कॉलेजच्या प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

‘रेडिओ आणि हवामान बदल’ ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती. सामान्य माणसाच्या मनात निसर्गाबद्दल आपलेपणाची भावना आणि जबाबदारीची जाणिव निर्माण व्हावी या उद्देशाने भंडारा जिल्ह्यातल्या नागझिरा जंगलात राहून व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेल्या जंगलातले दिवस या सचित्र नोंदवहीचे हे अभिवाचन डॉ. विनया केसकर आणि विराज सवाई यांनी केले. यासाठी चैतन्य जोशी यांनी पुरक असे पार्श्वसंगीत संयोजन केले होते. झाडावर लटकवलेला कंदील, तिरोडा ३२ किमी हा मैलाचा दगड, पितळी तांब्या भांडे, बैठकीवर टाकलेली कांबळ, नागझिरा जंगलाचा नकाशा अशा वस्तूंनी साधलेल्या वातावरणनिर्मितीने कार्यक्रमाची उंची वाढवली. विविध वयोगटातील उपस्थित निसर्गप्रेमी प्रेक्षकांनी वाचनास भरभरून प्रतिसाद दिला.
“तळ्यापलीकडे, डोंगराच्या उतारावर जी वृक्षराजी होती, तिच्यात काळ्या डोक्याचे पिवळे हळदुले पक्षी पुष्कळ होते. पिवळ्यारंजन रंगाची ही पाखरं जेव्हा या वृक्षावरून त्या वृक्षावर भरारत, तेव्हा पिवळ्या शाल्मलीच्या फुलांनाच पंख फुटले आहेत असं, वाटे.”
“समोरच्या हिरवळीवर नाना कीटक होते. हे कीटक टिपण्यासाठी नाना पाखरं येत. एक नीलकंठ पाखराचं जोडपं येई, हे नीळंगर्द पाखरू पंख पसरून अधांतरी झेप घेई तेव्हा माझ्या मनात येई, की स्वातंत्र्य या वस्तूचा रंग बहुधा निळा असावा” अश्या अनेक मार्मिक वाक्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माणसाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गातल्या अन्य घटकांवर होत असलेला परिणाम, आपल्या चुकीच्या सवयींमुळे निसर्गाची होत असलेली अपरिमित हानी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याविषयी शेडबळे यांनी मार्गदर्शन केलं.
‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ निर्मिती प्रमूख माधुरी ढमाले-कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले, निर्मिती सहाय्यक विद्या राणे यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पीसीसीओईच्या ‘आर्ट सर्कल’च्या विद्यार्थ्यांनी संयोजनात सहभाग घेतला.
पीसीईटीच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मातई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वांना जागतिक रेडिओ दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.








