ताज्या घडामोडीपिंपरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ” शिवशंभू शौर्यगाथा “

शाहिरी,व्याख्यान,शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा,रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत शहरातील वेगवेगळ्या पाच ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवशंभू शौर्यगाथा’ या भव्य महानाट्यासह ‘शाहिरीतून शिवदर्शन’, ‘सन्मान शिवरायांचा- रंग शाहिरी कलेचा’, ‘काव्यमय समाज प्रबोधन’, विविध विषयांवर व्याख्याने, ‘ढोल पथक वादन’, ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जीवनावर आधारित शाहिरी’, ‘जागर शिवचरित्राचा’ यांसह शालेय विद्यार्थ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर आधारित निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा,रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधनपर्व साजरे करीत असते. यानिमित्त यंदाही महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प उद्यान येथे होणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी,सुनेत्रा पवार,सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे,डाॅ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे,महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,विजयकुमार खोराटे,चंद्रकांत इंदलकर यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक,शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भक्ती शक्ती चौक निगडी येथील कार्यक्रम

निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान येथे हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘शाहिरीतून शिवदर्शन’ हा पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम शाहीर रामानंद उगले व त्यांचे सहकारी सादर करतील तर, रात्री ८ वाजता ‘असे होते छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर शिवव्याख्याते नितिन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच रविवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘सन्मान शिवरायांचा-रंग शाहिरी कलेचा’ हा शाहीर जळगाव येथील समाजभूषण शाहीर शिवाजीराव पाटील यांचा कार्यक्रम तर रात्री ८ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्याते उद्धव शेरे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

नियोजीत महापौर निवास, अ प्रभागाजवळ,निगडी येथील कार्यक्रम

पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी आशिया खंडातील गाजलेले भव्य महानाट्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आशियाखंडातील नामांकित ३०० कलाकारांचे उंट, घोडे, आदींसह दोन मजली रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवशंभू शौर्यगाथा’ हे भव्य महानाट्य शहरवासीयांसाठी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी याकाळात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत होणार आहे. प्रविण देशमुख व त्यांचे सहकारी या नाटकाचे सादरीकरण करणार आहेत.

चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर, चिंचवड येथील कमलनयन बजाज शाळेजवळ १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘काव्यमय समाज प्रबोधन’ हा कार्यक्रम होणार असून त्याचे सादरीकरण सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत (अकोला) व त्यांचे सहकारी करणार आहेत. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘आदर्श राजे-छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर शिवचरित्रकार आकाश भोंडवे यांचे व्याख्यान, १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध कवी-गायक,व्याख्याते संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम होणार आहे. तर येथील कार्यक्रमाचा समारोप १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘ढोल पथक सादरीकरण ’ कार्यक्रमाने होणार आहे.

डांगे चौक,थेरगाव येथे होणारे कार्यक्रम…

चिंचवड येथील डांगे चौक येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शिल्प उद्यान येथे १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर आधारित शाहिरीचा भव्य कार्यक्रम होणार असून १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन’ या विषयावर व्याख्याते दस्तगीर अझीज काझी यांचे व्याख्यान होणार आहे तर कार्यक्रमाचा समारोप १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘जागर शिवचरित्राचा’ या विषयावर कोल्हापूर येथील शिवव्याख्याते तात्यासाहेब मोरे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.

एच.ए.कॉलनी,पिंपरी येथे व्याख्यान…

पिंपरी येथील एच.ए.कॉलनी येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता रायगड येथील शिवव्याख्याते अँड. मारूती बबन गोळे (रायगड) यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान होणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे सर्वांसाठी प्रेरणादायीआहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५’ महोत्सव आयोजित केला असून सर्वांना विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमांना शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेखर सिंह आयुक्त तथा प्रशासक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button