आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
भोसरी,चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला बजेटमध्ये निधी देण्याची माजी नगरसेवकांनी केली मागणी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेशी सबंधित पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याक़डून गुरुवारी (ता.१३) घेतला. महापालिका अधिकारी आणि पिंपरी मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी माजी नगरसेवकांनी भोसरी,
चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला महापालिकेच्याा आगामी अर्थसंकल्पात निधी देण्याची मागणी केली.विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर आ.गोरखे यांनी पिंपरीची अशी ही पहिलीच बैठक घेतली.



महापालिका निवडणूक झाली नसल्याने गेले ३५ महिने महापालिकेत प्रशासक राज आहे.त्यामुळे नागरी प्रश्न तातडीने सुटत नसून विकासकामेही प्रलंबित आहे. त्यासाठी आ.गोरखेंनी ही बैठक घेतली.शहरातील दुसऱ्या विधान परिषद सदस्य उमा खापरे या परदेशात असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत. वैशिष्ट म्हणजे वॉर्ड तथा प्रभागनिहाय प्रलंबित समस्या त्यात मांडण्यात आल्या.त्यातील शक्य त्या लगेच सोडवतो असे आश्वासन आयुक्तांनी दिले.माजी नगरसेवक शीतल शिंदे,राजेश पिल्ले,राजू दुर्गे,संदीप वाघेरे,चेतन घुले,शैलेश मोरे,अनुराधा गोरखे,सुजाता पलांडे,शर्मिला बाबर,कुणाल लांडगे, कैलास कुटे,गणेश लंगोटे,आऱ.एस.कुमार,राजेंद्र बाबर,प्रदीप भोसले आदी यावेळी उपस्थित होते्.या सर्वांनी भोसरी,चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला बजेटमध्ये निधी देण्याची एकमुखी मागणी केली.

ज्येष्ठ माजी नगरसेवक आर.एस.कुमार यांनी निगडी-प्राधिकरणात भेडसावणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाकडे यावेळी लक्ष वेधले,प्राधिकरणातील वाहतूक कोंडीचाही मुद्दा मांडला. उद्यानांची देखभाल होत नसल्याचे सांगत महापालिकेची क्षेत्रीय़ कार्यालय इमारत अपुरी पडते आहे,असे बाबर म्हणाले. वाघेरे यांनी बजेटमध्ये आपल्या प्रभागासह पिंपरी गावासाठी निधी देण्याची मागणी केली.पिंपरी कॅम्प या शहराच्या बाजारपेठेतील व्य़ापाऱ्यांना वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले.झोप़डपट्टी पुनर्वसनाचे (एसआरए) काम नीट होत नसल्याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.श्रीमती गोरखे यांनी शाहूनगर येथे पडून असलेल्या अडीच एकरच्या भुखंडावर नाट्यगृह उभारण्याची मागणी केली.त्यांनी सुद्धा वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला.संत तुकारामनगर येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामाला वेग द्या,असे पालांडे म्हणाल्या.वल्लभनगर एसटी आगाराशेजारचा मोकळा भुखंड विकसित करा,अशी सूचना त्यांनी केली.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल पिल्ले यांनी खंत व्यक्त केली.ती सक्षम करण्यासाठी पीएमपएमलच्या ताफ्यात बसची संख्या वाढली पाहिजे,असे ते म्हणाले.बोपखेलवासियांच्या सोईसाठी बांधण्यात आलेल्या नव्या पुलावर दिशादर्शक फलक नसल्याने तिकडे जाणारी नव्या व्यक्तींचा गोंधळ होत आहे. त्यामुळे हे फलक तातडीने लावावेत,अशी मागणी घुले यांनी केली.दुर्गे यांनी पाणी,रस्ते हे प्रश्न मांडले.तर,बीआरटीमुळे रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी तसेच पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याकडे मोरे यांनी लक्ष वेधले.अनधिकृत पार्किंगच्या मो्ठ्या समस्येकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे तसेच बीआरटीमुळे रस्ता रुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितले.पादचाऱ्यांची सुद्धा रस्ता अरुंद झाल्याने गैरसोय होत आहे,असे ते म्हणाले.अनधिकृत पार्क केलेल्या वाहनांच्या गराड्यातून पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागतो,जीव धोक्यात घालून रस्त्यातून चालावे लागते,असे ते म्हणाले.येत्या काही दिवसांत सादर होणाऱ्या महापालिका बजेटमध्ये आपला प्रभागच नाही,तर आपल्या पिंपरी मतदारसंघालाही भरीव निधी देण्याची मागणी केली. पिंपरीतील प्रलंबित प्रश्न तथा विकासकामांचा आढावा नियमितपणे घेतला जाणार असल्याचे आ. गोरखे यांनी या बैठकीनंतर सांगितले.








