नवीन जलशुध्दीकरण केंद्र ते इंद्रायणी नदी पर्यंत नाला बांधण्याच्या विषयास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका हद्दीत विविध ठिकाणी जलनिस्सारण नलिका टाकणे, जलनिस्सारण विषयक सुधारणा विषयक कामे करणे, पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, रस्त्याची दुरुस्ती व हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या विषयासह विविध विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.



पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समिती सभा आणि महापालिका सभा आज पार पडली. प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेले विविध विषय या बैठकीत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

या बैठकीत चऱ्होली व कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. २ चिखली, मोशी, प्रभाग क्र. ९ नेहरूनगर, अजमेरा सोसायटी व उर्वरित परिसरात जलनिस्सारण नलिका आणि मॅनहोल चेंबर चे वार्षिक पद्धतीने देखभाल दुरुस्ती करणे, कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रांतर्गत इंद्रायणीनगर सेक्टर क्र. १ ते १३ मधील लांडगेनगर, गवळीमाथा, खंडेवसी, बालाजीनगर व उर्वरित परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करण्याच्या विषयास स्थायी समिती सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ येथील पुणे बेंगलोर हायवेच्या पूर्वेकडील वाकड, ताथवडे परिसर व इतर भागात पावसाळी पाण्याची लाईन टाकणे व स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्र. ४ बोपखेल येथील विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण करून सुधारणा करणे व विकसित करणे, प्रभाग क्र. ८ सेक्टर नं. ४,६,९ येथील एमआयडीसी व इतर ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करणे व हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या विषयास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १ मोरेवस्ती, चिंचेचा मळा परिसरात आवश्यक ठिकाणी नवीन ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे, शेलारवस्ती परिसरातील रस्ते व महापालिकेच्या ताब्यात असलेले औद्योगिक परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे आणि नवीन जलशुध्दीकरण केंद्र ते इंद्रायणी नदी पर्यंत नाला बांधण्याच्या विषयास बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
प्रभाग क्र. २ मधील चिखली, कुदळवाडी परिसरातील रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. १२ मधील गणेशनगर, रुपीनगर, सहयोगनगर परिसरातील स्टॉर्म वॉटर लाईनची दुरुस्ती करणे, आवश्यक्तेनुसार नव्याने स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे, प्रभाग क्र. ११ मधील शरदनगर मधील नव्याने ताब्यात येणाऱ्या रस्त्यांचे खडीमुरुमीकरण व डांबरीकरण करणे, आणि पूर्णानगर शिवतेज नगर, फुले नगर, कृष्णानगर भागातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, प्रभाग क्र ९ मधील उद्यमनगर, खराळवाडी व इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ६ मधील महादेव नगर, लांडगे वस्ती, सद्गुरू नगर व परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या विषयास या बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
शहरातील वापरात नसलेले किंवा दुरावस्थेत असलेले सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचा सर्व्हे करून निष्कासित करण्याच्या विषयासह ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नवीन तालेरा हॉस्पीटलमध्ये ऑपरेशन थिएटर करिता विद्युत विषयक तसेच मेडिकल गॅस पाईपलाईन व इतर अनुषंगिक कामे करण्याच्या विषयास महापालिका सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.








