अनधिकृत आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत – आमदार शंकर जगताप


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील अनधिकृत रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्समुळे वाढत्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता हे प्लांट सुरू असल्याने श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन अशा अनधिकृत प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्याची आणि ते त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.



चिंचवड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असून, बांधकामांसाठी रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्स वापरले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार शंकर जगताप यांनी ही मागणी केली आहे.

आरएमसी प्लांट्समुळे सतत मोठ्या प्रमाणावर धूळ हवेत पसरत असल्याने नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच, हे प्लांट्स रात्रंदिवस सुरू असल्याने मोठ्या वाहनांची वर्दळ आणि मशीनच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून चालू असलेल्या या आरएमसी प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच परवानगीशिवाय चालणारी सर्व प्लांट्स तात्काळ बंद करण्यात यावीत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.








