‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा उदंड प्रतिसादात संपन्न


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘समर्थ रामदासस्वामी यांनी मनावर ताबा मिळविण्याचे शिक्षण जगाला दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्यास विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण नगण्य होईल!’ असे मत विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी मॉडर्न शैक्षणिक संकुल, यमुनानगर, निगडी येथे रविवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यक्त केले. समर्थ भारत अभियान आयोजित आंतरशालेय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अमित गोरखे बोलत होते. सज्जनगड संस्थान चिंचवड विभाग विश्वस्त जयंत कुलकर्णी, समर्थ रामदासस्वामी अभ्यासक विजय गाडगीळ, संयोजक डॉ. राजीव नगरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच पिंपरी – चिंचवड परिसरातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने समारंभात सहभागी झाले होते.



जयंत कुलकर्णी यांनी, ‘आपल्याला मिळालेला देह ही भगवंताची कृपा आहे, अशी शिकवण ‘मनाचे श्लोक’ यांमधून मिळते. त्यांचे नियमित पठण केल्यास अभ्यासात एकाग्रता आणि जीवनात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य येईल!’ असे विचार मांडले; तर विजय गाडगीळ यांनी, ‘मानवी जीवनाचे सार्थक ‘मनाचे श्लोक’ अंगीकारल्यास होते!’ असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकातून डॉ. राजीव नगरकर यांनी, ‘समर्थ रामदासस्वामी यांचे विचार आणि कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून शालेय स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यातील विजेत्यांमधून राज्यस्तरीय पाठांतर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल!’ अशी माहिती दिली.

शिशूगट ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सुमारे सात गटांमध्ये विभागणी करून ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत
सहभाग नोंदविला होता. प्रथम क्रमांकाचे विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे :-
शिशूगट :-
शौर्य साटम
हिरण्या सप्रे
शांभवी माळी
शांभवी विधाते
खेळगट :-
प्रद्युम्न बेलाकर
पहिली दुसरी गट :-
सायेशा पाटील
साईराज सावकार
प्रज्ञा पाटील
मिहाल महाजन
तिसरी – चौथी गट :-
वेदिका लिमये
आदिती कुलकर्णी
पाचवी – सहावी गट :-
अनुप कुंभार
सातवी – आठवी गट :-
आर्या भिडे
नववी – दहावी गट :-
मिहीर काळे
पालक – शिक्षक गट :-
आर्या भागवत
विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी शाळेला सर्वाधिक सहभाग आणि सांघिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याप्रीत्यर्थ गौरविण्यात आले; तसेच परीक्षकांना भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शिल्पा नगरकर, हेमंत जोशी, डॉ. योगिता तोडकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रिया जोग यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजीव नगरकर यांनी आभार मानले.








