नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही दिन उपक्रम प्रभावी- चंद्रकांत इंदलकर


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि प्रश्नांचे निराकरण वेगाने करण्यासाठी लोकशाही दिन उपक्रम अत्यंत प्रभावी असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी लोकशाही दिन उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.



महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागरिकांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर बोलत होते. यावेळी उपआयुक्त तथा समन्वय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता एस.एन नरोटे, प्रभारी कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते, प्रशासन अधिकारी अधिकारी श्रद्धा बोर्डे, उपअभियंता विकास घारे, नरेश जाधव,कनिष्ट अभियंता संतोष जगदाळे, ए. एम. वाकोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त इंदलकर म्हणाले, लोकशाही दिनाच्या निमित्ताने नागरिक विविध नागरी समस्या, पायाभूत सुविधा, मालमत्ता कर, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर तक्रारी आणि सूचना प्रशासनासमोर मांडू शकतात. प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून या तक्रारींची दखल घेतात आणि त्वरित उपाययोजना केली जाते. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही दिन प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी या लोकशाही दिन उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले. आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमात २ तक्रारी प्राप्त झाल्या.
अर्ज स्वीकृतीचे निकष
लोकशाही दिनासाठी दाखल करावयाच्या अर्जाच्या विहित नमुन्यातील प्रती नागरिकांना सहजतेने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज करताना यामध्ये नमूद तक्रारीवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असेल. हा अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे असावा. नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठवणे आवश्यक राहील. लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाही.








