करसंकलन विभागाकडून शनिवारी करसंवादाचे आयोजन
मालमत्ता जप्तीची धडक मोहिम व करवसुलीच्या विविध अभियानाबाबत मिळणार माहिती


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )– करदात्यांच्या शंकाचे निरसनासाठी करसंकलन विभागाने करसंवाद उपक्रम सुरू केला. नागरिकांच्या मालमत्ताकराबाबतच्या शंका, प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी शनिवार, दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी, 11.30 वाजता करसंवादाचे ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात आयोजन केले असून नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन प्रतिसाद द्यावा. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये थेटसंवाद असा उद्देश असलेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काळ माहिती पुरविण्यात येईल. यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनेल व सोशल मीडियावर अकाऊंटवर आपले प्रश्न विचारून आपल्या शंकाचे तात्काळ निरसन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.



कोट –

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्याचे विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. सध्या शहरातील थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची धडक मोहिम सुद्धा सुरू आहे. मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी. आपल्या मालमत्तेबाबत कोणत्याही शंका असल्यास विभागाकडे मांडून त्याबाबत शंकाचे निरसन करून घ्यावे. याचसाठी शनिवारी करसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने करसंवादामध्ये सहभाग नोंदवून मालमत्ता जप्तीची धडक मोहिम व आदी अभियानाबाबत माहिती घ्यावी.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका








