नळकनेक्शन तोडणीबाबतचा वारंवार येणारा ‘एसएमएस’ फसवणूकीचा!


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी – चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू, शहरात नागरिकांचे आज रात्री 9 वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल, अशा आशयाचे देवेश जोशी, महापालिका अधिकारी या नावाने व 9309445824/9325848115 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनपर फसवणूक करणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. असे ‘एसएमएस’ हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. असे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.



चौकट – कोणत्याही लिंकद्वारे कोणतेही ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नका!

तुमच्या माहितीमध्ये बदल आहेत, तुम्ही माहिती बदल करण्यासाठी सदर ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठीचे एसएमएस तुमच्या व्हाट्सअपवरती येत आहेत. तरी त्याप्रकारच्या लिंक, ऍप्लिकेशन डाऊनलोड न करता त्याकडे दुर्लक्ष करावे. आपणास आपल्या माहितीबाबत, पाणीपट्टीबाबत कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास महानगरपालिकेच्या ८८८८००६६६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करसंकलन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
नागरिकांनी ‘फ्रॉड’ एसएमएसकडे दुर्लक्ष करावे !
महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना करसंकलन विभागाकडून थकीत पाणीपट्टी भरण्याचे अधिकृत क्रमांक व सिस्टिमवरुन एसएमएस करण्यात येत आहेत. आपणास कधीही कोणत्याही मोबाईल क्रमाकांवरुन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत नाही. तरी नागरिकांनी अशा क्रमांकावरुन आलेल्या एसएमएस कडे दुर्लक्ष करुन आर्थिक फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आय़ुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका








