‘जिव्हाळा’ हे मित्रत्वाचे प्रतीक! – राजन लाखे


ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचा वर्धापनदिन संपन्न



पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ”जिव्हाळा’ हे मित्रत्वाचे प्रतीक आहे!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी विरंगुळा केंद्र, पागेच्या तालमीसमोर, चिंचवडगाव येथे (सोमवार, दिनांक २७ जानेवारी) येथे व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जिव्हाळा’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त पिंपरी – चिंचवड महापालिका अग्निशमन अधिकारी किरण गावडे, लायन्स क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष बाबूराव सागावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
राजन लाखे पुढे म्हणाले की, ‘आयुष्याला वय असते; पण वयाला आयुष्य नसते. अध्यात्माकडील वाटचालीत हा ‘जिव्हाळा’ आनंद प्रदान करणारा आहे; कारण वैयक्तिक, कौटुंबिक अन् सामाजिक परीघ व्यापून तो माणसाला माणूस जोडण्याचे काम करतो आहे!’ किरण गावडे यांनी, ‘प्रत्येक व्यक्तीने आयुष्याच्या वळणावर आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलावा!’ अशी अपेक्षा व्यक्त केली; तर बाबूराव सागावकर यांनी, ‘ज्येष्ठांच्या अनुभवाचा लाभ सर्व क्षेत्रांत होऊ शकतो असा माझा स्वानुभव आहे!’ असे मत मांडले. अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून संघाच्या उपक्रमांबाबत माहिती देऊन सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि त्रिवार ओंकार करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शंखनाद, टाळचिपळ्यांची साथ आणि फुलांची उधळण करीत सजवलेल्या पालखीतून ‘जिव्हाळा’ अंकाच्या प्रती अपूर्व उत्साहात व्यासपीठावर प्रकाशनासाठी आणण्यात आल्या. ”जिव्हाळा’ हा अंत:करणातील उमाळा आहे!’ अशा भावोत्कट शब्दांतून संपादक नंदकुमार मुरडे यांनी या वार्षिकांकाचे अंतरंग उलगडून सांगितले. लायन वसंत गुजर यांच्या प्रयत्नांतून आणि लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघासाठी आरोग्य साधने उपलब्ध करून देण्यात आली.
ज्या सभासदांच्या विवाहाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत अशा दांपत्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. वार्षिक अंकासाठी सहकार्य करणार्या व्यक्तींचा तसेच संघातील गटप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. उषा गर्भे, रत्नप्रभा खोत, मंगला दळवी, अलका इनामदार, मंदाकिनी दीक्षित, नीलिमा कांबळे, भिवाजी गावडे, सतीश कुलकर्णी, गोपाळ भसे, सूर्यकांत पारखी, चंद्रकांत पारखी, नारायण दिवेकर, सुदाम गुरव, शामकांत खटावकर, दिलीप तांबोळकर, सुधाकर कुलकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर, शहाजी कांबळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजाराम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले.








