लोकशाहीच्या रक्षणासाठी शहर कॉंग्रेसचा मशाल मोर्चा
निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात काँग्रेसची न्यायालयीन चौकशीची मागणी - डॉ. कैलास कदम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या गंभीर अनियमितता, मतदारयादीतील घोळ आणि मतदान टक्केवारीतील तफावत या मुद्यांवर न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीच्या समर्थनार्थ (दि. २६ जुलै २०२५) “मशाल मोर्चा” काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात लकी बेकरी, काळेवाडी पुलासमोरून झाली आणि समारोप पाचपीर चौक, काळेवाडी येथे झाला. केंद्र आणि राज्य सरकारच्या हुकूमशाही वृत्ती, स्वायत्त संस्थांवरील दबाव, आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात जनजागृती करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद होती. अवघ्या पाच महिन्यांत ४१ लाख नव्या मतदारांची भर, तसेच मतदानाच्या आकडेवारीत ८ टक्के फरक, हे निव्वळ ‘डेटा मॅनिप्युलेशन’ आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
लोकशाही म्हणजे निवडणुकीवर जनतेचा विश्वास. जर तोच ढासळला, तर ही संपूर्ण व्यवस्था फार्स ठरेल. काँग्रेस पक्ष याला मुळापासून विरोध करणार असून, संपूर्ण राज्यभर आवाज उठवणार आहे.”
यापुढे डॉ. कदम म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे ठाम मत आहे की, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवरील जनतेचा विश्वास टिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी त्वरित व्हावी, तसेच महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा त्वरित रद्द करावा व शासनाने जनसुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली.
या मशाल मोर्चात शहर काँग्रेसचे अशोक मोरे, भाऊसाहेब मूगुटमल, वाहब शेख, शहाबुद्दीन शेख, मयूर जयस्वाल, ॲड.अनिरुध्द कांबळे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, सोमनाथ शेळके, अबूबकर लांडगे, सचिन कोंढरे पाटील, महेश पाटील, अमरजीतसिंग पोथीवाल, राहुल शिंपले, निर्मला खैरे, अरुणा वानखडे, जनदबी सय्यद, आशा भोसले, सीमा यादव, भारती घाग, आशा बोरकर, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, राणी निंबाळकर, सुरेखा मिसाळ, सविता चव्हाण, पल्लवी गायकवाड, तबसुम शेख, पूनम इंगळे, आरती खरात, अनकिता मानकर, सोनाली शिंदे, मजहर खान, वसंत वावरे, मिलिंद फडतरे, फिरोज तांबोळी, भिमराव जाधव, बाबूलाल वाघमारे, ॲड. अनिकेत रसाळ, सतीश भोसले, बाबासाहेब पाटील, सुरज कोथींबीरे, सचिन पवार, हसन पटेल, फिरोज मुलाणी, इमरान शेख, आशुतोष खैरे, अमित मोरे, गणेश बंदपट्टे आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




















