मराठी बाल साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची ग्रंथदिंडीने सुरुवात


वाचन संस्कृतीचा विद्यार्थ्यांनी केला जागर : पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग



चाळकवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची ग्रंथदिंडीने दिमाखदार सुरुवात झाली.
चाळकवाडी लगतच्या महामार्गापासून सुरू झालेली ग्रंथदिंडी गावातून फिरून कविवर्य ग. ह. पाटील बालसाहित्य नगरीत (संमेलनस्थळी) आली. महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‘ज्ञानदेव-तुकाराम’ नामाचा गजर करत ग्रंथदिंडीतील विद्यार्थ्यांनी ‘वाचन संस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानपंढरी’, ‘ग्रंथ हेच गुरू’, ‘जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक’, ‘ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती’ असे फलक घेऊन वाचन संस्कृतीचा जागर केला. विद्यार्थ्यांच्या लेझीम-ढोल पथकाचा ग्रंथदिंडीत सहभाग होता. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन झाले. शिवांजली प्राथमिक विद्यालय, शिवांजली विद्यानिकेतन, शिवाजी विद्यार्थी वसतीगृह, न्यू इंग्लिश स्कूल, आंबोडी, मारोतराव लांडगे विद्या निकेतन, कळंब, जि. प. प्राथमिक शाळा, चाळकवाडी, कोळवाडी, पिंपळवंडी, सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी, विशाल जुन्नर सेवा मंडळ शैक्षणिक संकुल, कांबळी या शाळांमधील विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत सहभाग होता.

संमेलनस्थळी ध्वजारोहण
संमेलनाध्यक्ष सूर्यकांत सराफ, अनिल मेहेर, शरद लेंडे, माधव राजगुरू, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, श्रीकांत चौगुले, संजय ऐलवाड, राजेंद्र चौगुले, मुरलीधर साठे, अशोक सातपुते, सचिन बेंडभर, मुरलीधर साठे, मुकुंद आवटे, एकनाथ आव्हाड, मिलिंद कसबे, अनिल काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनस्थळी ध्वजारोहण झाले.
आत्मनिर्भरतेसाठी शिक्षण-साहित्य आवश्यक
ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात अनिल मेहेर म्हणाले, साहित्यकलेचा आविष्कार, अभिरूची व्यक्त केली जाते त्यामागे साहित्यिकाची विशिष्ट भूमिका असते. राष्ट्र उभारणीसाठी, आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी शिक्षणाची व त्याला जोड म्हणून साहित्याची आवश्यकता आहे. बालसाहित्याविषयीची रुची मुलांमध्ये वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालसाहित्यिक, बालकवी मुलांच्या मनावर संस्कार करत असतात, त्यांची जडणघडण करण्याचे कार्य करीत असतात. संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी भाषा आणि साहित्याची जपणूक महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी साहित्य चळवळ राबवावी.
प्रास्ताविक माधव राजगुरू यांनी केले. आभार शरद लेंडे यांनी मानले. सुरुवातीस भोसले आणि मंडळींनी समतेचा गोंधळ सादर केला. सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले.








