विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन


‘पर्पल जल्लोष २०२५’ चा समारोप उत्साहात



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनाच्या वतीने १७ ते १९ जानेवारी या कालावधीत ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, तानाजी नरळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, संगीता काळभोर, राजेंद्र वागचौरे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह दिव्यांग बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशन यांनी दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी जे पाऊल उचलले आहे ते कौतुकास्पद आहे. आजचा हा सोहळा म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा केलेला सन्मान आहे. असा अनोखा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभिनंदन करतो. पर्पल जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यामागे असणारा उद्देश खूप मोठा आहे. याठिकाणी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था यांच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी एखाद्या उद्योगाला मानवी भावनांची जोड मिळाली तर प्रगती करणे सहज शक्य होते याचा प्रत्यय आला, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिले दिव्यांग भवन उभारण्याचे काम केले आहे. त्याबद्दल मी महापालिका आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमातून राज्यातील दिव्यांग संघटनांना मार्गदर्शन ठरावे असा जल्लोष झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्यात येत असतात. केंद्र व राज्य सरकारच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना या दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यासोबतच त्यांना न्याय देण्याचे, त्यांना आधार देण्याचे काम करणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश तसेच दिव्यांग भवन फाऊंडेशनबाबत माहिती दिली. शेखर सिंह म्हणाले, ‘दिव्यांग बांधवांचे उत्कर्ष आणि विकासाला केंद्रबिंदू मानत ‘पर्पल जल्लोष’ हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्रात सर्वात प्रथम दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन सुरू केले. याठिकाणी २१ प्रकारच्या दिव्यांगत्वावर मोफत सल्ला व मार्गदर्शन, विविध प्रकारच्या थेरपी, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार असे विविध उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहेत. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी साहित्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, फिल्म फेस्टिव्हलसारखे कार्यक्रम या पर्पल जल्लोषमध्ये घेण्यात आले.
याप्रसंगी दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आभार दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी मानले तर सूत्रसंचालन महापालिका विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.
चौकट
पर्पल जल्लोष म्हणजे समाजाच्या संघटीत प्रगतीचे उत्तम उदाहरण
‘दिव्यांग व्यक्ती समाजाचा भाग होण्यासाठी जे प्रयत्न सुरू असतात, त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. पण अशा प्रयत्नांना पर्पल जल्लोषच्या माध्यमातून बळ मिळते. पर्पल जल्लोष सोहळा म्हणजे समाजाची संघटीत प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. जन्मजात दिव्यांगांना लवकरात लवकर मदत मिळावी, उपचार मिळावेत, यासाठी निधी देऊन तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे काही कलागुण आहेत, त्याचा योग्य वापर करून पुढे जात रहावे. समाजिक बांधिलकी जोपासून आपल्याकडून ज्या पद्धतीने मदत करणे शक्य होईल ती करावी,’ असे आवाहन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी यावेळी केले.
चौकट
पर्पल सॉल्वथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार
पर्पल जल्लोष कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्पल सॉल्वथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सॉल्वथॉन स्पर्धेमध्ये इंजिनीअरिंग थीम मध्ये जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाला. या महाविद्यालयाच्या टीममध्ये पियुष जोशी आणि राज तिलक जोशी यांचा समावेश होता. तर, आर्किटेक्चर थीम मध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ ऑर्किटेक्चर या महाविद्यालयाच्या टीमला प्रथम क्रमांक मिळाला. या महाविद्यालयाच्या संघात संजना कुलकर्णी, अमृता कोंडे, सलोनी बांदल, सृष्टी आढाव यांचा समावेश होता. या दोन्ही संघांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.








