पर्पल जल्लोष – दिव्यांगांच्या महाउत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्पल जल्लोष – दिव्यागांचा महाउत्सव’ कार्यक्रमाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या दि १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.



केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या समारंभास राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह या क्षेत्रातील खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचे केंद्रिय सचिव राजेश अगरवाल, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, दिव्यांग कल्याण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर आदी अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, कार्पोरेट कंपन्या आणि विविध संस्थांच्या सहभागाद्वारे दिव्यांगांसाठी शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा यासह विविध क्षेत्रातील नवनवीन संधींची दारे उघडली जाणार आहेत. यासोबतच दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी साहित्य संमेलन, कविसंमेलन, परिसंवाद, चर्चासत्र, फिल्म फेस्टिव्हल, फॅशन शो तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्पल जल्लोषानिमित्त महापालिकेची इमारतही सजली पर्पल रंगात
पर्पल जल्लोष कार्यक्रमासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली असून पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारत देखील पर्पल रंगाच्या विद्युत रोषणाईने सजवण्यात आली आहे. दिव्यांगांप्रती असलेला स्नेहभाव प्रत्येकाच्या मनात रुजवून दिव्यागांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्पल जल्लोष उपक्रम राबवून दिव्यांगांच्या कलागुण आणि प्रतिभेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना देखील या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी विशेष सवलत देण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.
दिव्यांग साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘साहित्य जत्रा’ भरवण्यात आली आहे. यामध्ये नव कवी संमेलन’, ‘गप्पा लेखकांशी’, ‘गझलरंग’, ‘कथाकथन’, ‘निमंत्रितांचे कवी संमेलन’, ‘परिसंवाद’, ‘सतत कवी कट्टा’ अशा भरगच्च कार्यक्रम असणार आयोजित केले आहेत.
‘नव कवी संमेलनात सचिन वाघमारे, लतिका उमप, सुशिला आवलोळ, सुप्रिया यादव, दीपिका क्षीरसागर, गणेश निकम, राकेश खैरनार, नवनाथ भारभिंगे आदी कवी सहभागी होऊन त्यांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. तर सूत्रसंचालन विजय आव्हाड करणार आहेत. ‘गप्पा लेखकांशी’ या कार्यक्रमात सोनालीताई नवांगूळ, सुधीर देवरे, बापू बोभाटे या तीन दिव्यांग साहित्यिकांच्या मुलाखती निलेश छडवेलकर घेणार आहेत. ‘गझलरंग’ या कार्यक्रमात गझल कशी लिहावी? गझल काय असते? याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर, दिव्यांग गझलकार विजय आव्हाड, निर्मिती कोलते, विश्वजित गुडधे, श्रीकृष्ण राऊत यामध्ये गझल सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वैराळकर करणार आहेत. त्यानंतर ‘कथाकथन’ हा कार्यक्रम होणार असून यामध्ये दिव्यांग कलाकार अजित कुंठे, सुमित जाधव, रेवणनाथ कर्डिले हे त्यांच्या स्वरचित कथा सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय तनपुरे करणार आहेत. ‘निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये भूषण तोष्णीवाल, संजय पवार, धम्मपाल बाविस्कर, गणेश खरात, बापुराव खरात, राजेंद्र लाड, नरेश शिंदे, केशरचंद राठोड, अहमद शेख हे कवी कवितांचे सादरीकरण करणार आहेत. रुपेश पवार हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
साहित्य जत्रेमध्ये ‘चित्रपट, साहित्य आणि दिव्यांगंत्व’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परिसंवादात पंकज साठे, राजेश्वरी किशोरी आदी मान्यवर सहभागी होणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रविंद्र नांदेडकर करणार आहेत.
सतत कवी कट्टा
साहित्य जत्रे अंतर्गत ‘सतत कवी कट्टा’ हा कार्यक्रम १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रम स्थळी भेट देणारी कोणतीही दिव्यांग व्यक्ती कविता सादर करू शकणार आहे.








