‘लाइटहाऊस कौशल्यम’ उपक्रमाच्या माध्यमातून यावर्षी १ हजार २०४ तरुणांना मिळाला रोजगार


उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३ हजार ६९२ तरुणांना मिळाली संधी



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईटहाऊस यांच्या माध्यमातून कौशल्यम उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून वर्ष २०२४-२५ मध्ये डिसेंबरपर्यंत १ हजार २०४ युवकांना रोजगार मिळाला आहे.

कौशल्यम उपक्रमाची सुरुवात २०२१ मध्ये झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत ७५ टक्के रोजगार संधीमध्ये वाढ झाली आहे. या अंतर्गत ३ हजार ६९२ युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी २ हजार ७५५ युवकांना रोजगार मिळाला आहे.
शहरातील ११ केंद्रांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमात रिटेल, आयटी, आरोग्यसेवा (हेल्थकेअर), उत्पादन व्यवसाय (मॅन्युफॅक्चरिंग) आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये उद्योगाशी संबंधित विविध कोर्सेचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामध्ये व्यावहारिक प्रशिक्षण, वैयक्तिक समुपदेशन आणि उद्योगाचे अनुभव, यावर लक्ष केंद्रित केले जाते. एकंदरीतच ‘लाइटहाऊस कौशल्यम’ उपक्रम युवकांना सक्षम आणि सशक्त करीत त्यांच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक बदल घडवत आहेत.
चौकट
‘लाइटहाऊस कौशल्यम’ उपक्रमात रोजगाराच्या बदलत्या गरजांना अनुसरून विविध प्रकारचे कौशल्य अभ्यासक्रम तयार केले जातात. रिटेल, आयटी आणि डिजिटल कौशल्ये, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांतील या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना रिटेल, बीएफएसआय (बँकिंग, वित्तीय सेवा, आणि विमा), लॉजिस्टिक्स आणि हेल्थकेअर यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत झाली आहे. एवढेच नव्हे तर कौशल्य विकासापलीकडे जाऊन वैयक्तिक करिअर समुपदेशन आणि मॉक इंटरव्ह्यू अशा सुविधांमुळे विद्यार्थी केवळ प्रशिक्षितच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रासाठी तयार होतात. ‘लाइटहाऊस कौशल्यम’च्या यशाचे श्रेय ५० हुन अधिक नियोक्त्यांच्या मजबूत सहकार्याला सुद्धा जाते. एचआर कॉन्क्लेव्हमध्ये सक्रिय सहभाग घेणारे हे नियोक्ता युवकांना मौल्यवान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मदत करतात.
चौकट
विविध कोर्सेस करण्याची मिळतेय संधी
‘लाइटहाऊस कौशल्यम’ उपक्रमातर्गत अकाउंट एक्झिक्युटिव्ह, रिटेल एक्झिक्युटिव्ह, लॉजिस्टिक, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, एमआयएस डेटा ॲनालिस्ट, ऑफिस एक्झिक्युटिव्ह, टू-व्हीलर रिपेअरिंग, अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन डिप्लोमा, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन मेकॅनिक, नर्सिंग केअर, सीएनसी ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझाइन, बँकिंग रिलेशनशिप ऑफिसर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, कॅफे मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन हार्डवेअर अँड नेटवर्किंग, मोबाइल रिपेयरिंग, मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असे विविध कोर्स करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे.
चौकट
येथे करा संपर्क
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, बोऱ्हाडेवाडी, बोपखेल, दापोडी, नेहरू नगर, किवळे, आकुर्डी याभागात ‘लाइटहाऊस’ उपलब्ध आहेत.
‘लाइटहाऊस कौशल्यम’ उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 1800 202 0110 वर किंवा kaushalyam@lighthousecommunities.org या ई-मेलवर संपर्क करता येईल.
‘लाइटहाऊस कौशल्यम’ उपक्रम युवकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण कशा पध्दतीने उपयोगी ठरू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. कौशल्यम सारखे उपक्रम समाजाला स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याच्या दृष्टिने राबविण्यात येतात. त्याबरोबरच, उद्योग, प्रशासन, आणि नागरिक एकत्र आल्यानंतर कशा पध्दतीने बदल घडू शकतात, याचे एक उत्तम उदाहरण आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
लाइटहाऊसने मला माझी क्षमता ओळखून देऊन योग्य करिअरकडे मार्गदर्शन केले. त्यांच्या पाठिंबा व सहकार्यामुळे मी आता सीएनसी ऑपरेटर म्हणून काम करत असून यामुळे माझ्या आयुष्याला नवे वळण मिळाले आहे.
– सौरव परमेश्वर हडिमनी, रोजगारप्राप्त तरुण
मला महिंद्रा अँड महिंद्रामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे. लाइटहाऊसमध्ये मला प्रशिक्षण मिळाल्याने मला नोकरी मिळविण्यासाठी खूप मदत झाली. लाइटहाऊस उपक्रमामुळे माझे आयुष्य बदलले असून आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये मदत झाली आहे.
– गौरव रोहिदास फुलवारे, रोजगारप्राप्त तरुण
लाइटहाऊसने माझा मुलगा गौरव याला योग्य मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी दिल्या. ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि आमच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. यासाठी मी लाइटहाऊसचे सदैव ऋणी राहीन.
– अनिता फुलवारे, पालक








