राज्यातील गो-संवर्धनासाठी पुण्यात ओंकारेश्वराची महाआरती ! – कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती


– राज्यातील गो-रक्षकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यात गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि गोरक्षकांच्या मागण्यांसाठी महायुती सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. तसेच, या पुढील काळातही गोसंवर्धनासाठी शेती-माती-संस्कृतीसाठी कटिबद्ध आहोत. कायदा असतानाही गोहत्या केली जात असेल, तर भगवाधारी महायुतीच्या सरकारमध्ये कुणाचेही लांगुलचालून करु देणार नाही. कायदा प्रत्येकाला पाळावा लागेल, असा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात महादेवाच्या नंदींचे व गोमातेच्या रक्ताचे वाहणारे पाट थांबवून शेतकरी समृद्ध व्हावेत. यासाठी पुण्याचे आराध्य दैवत भगवान श्री. ओंकारेश्वराच्या प्राचीन मंदिरात महाआरती करण्यात आली.
राज्यातील गोरक्षक, गोभक्त आणि गोसेवकांच्या वतीने महादेवासमोर गोरक्षण व गोसंवर्धनासाठी संकल्प केला. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार महेश लांडगे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न झाली. महाआरतीचे नियोजन गोरक्षक शिवशंकर स्वामी, सोमनाथ भोसले यांनी केले होते.
महाराष्ट्राला कत्तलखानामुक्त करणार…
कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले की, गोमातेकडे कुणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. हिंदू म्हणून थाटात फिरा. कुणाला घाबरण्याची आवश्यकता नाही. जो अधिकारी गाईच्या कत्तलीला प्रोत्साहन देत असेल, त्याचे फक्त नाव द्या. गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे महायुती सरकार आहे. गोरक्षकांनी आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. गोहत्या बंदीचा कायदा आणखी कडक करण्यासाठीसुद्धा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहोत. आगामी काळात महाराष्ट्राला कत्तलखानामुक्त करणार आहोत, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
‘‘आमची सगळी मुलं गोरक्षणासाठी दिवस रात्र पळत आहेत. हिंदुत्वाचा विचार जपत गो-सेवक नि:स्वार्थपणे काम करीत आहेत. हिंदू धर्मातील आठरा पगड जाती, बारा बलुतेदार या सर्वांना सोबत घेवून देव-देश अन् धर्म रक्षणासाठी कटिबद्ध आहोत. गोमातेच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालून काम करणारे गोरक्षक यांच्या पाठीशी महायुती सरकार राहणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा.








