ई-रिक्षा धारकांना महापालिकेच्या वतीने ३० हजार रुपये अनुदान; पहिल्या १५०० रिक्षाधाराकांना मिळणार लाभ – आयुक्त शेखर सिंह


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- शहरातील वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच ई-वाहन वापर धोरणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ई वाहन धोरणाअंतर्गत महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ई रिक्षाधारकांना अनुदान धनादेश देण्यात आला. शहरातील जास्तीत जास्त ई-रिक्षाधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण २०२१’ राबविण्याबाबत मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने शहरातील वायू प्रदूषण कमी करणे तसेच ई-वाहन धोरणाला चालना देणे, ई-वाहन वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे यासाठी महापालिकेच्या वतीने ई रिक्षाधारकांना अनुदान देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकराव पवळे स्थायी समिती सभागृह येथे ई-रिक्षा धारकांना धनादेश वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ई रिक्षाधारकांना प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, सह शहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत वायु प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत, जास्तीत जास्त ईव्ही बॅटरी (L5M) इलेक्ट्रिक तीनचाकी प्रवासी वाहतूक वाहन (थ्री व्हिलर पॅसेंजर टी.आर.) तसेच ईव्ही बॅटरी मालवाहतूक (L5N) तीन चाकी माल वाहतूक वाहन (थ्री व्हिलर गुड्स कॅरिअर टी.आर.) यांचा वापर करून शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
या ई वाहन धोरणाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नोंद असलेल्या सुमारे १ हजार पाचशे ई रिक्षाधारकांना प्रत्येकी ३० हजार रुपये अनुदान देण्यात येत असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी २३ जुलै २०२२ नंतर खरेदी केलेल्या ई-रिक्षा वाहनांसाठी महानगरपालिकेतर्फे ३०,००० रुपयांचे अर्थसहाय्य अनुदान दिले जाणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर १५०० ई- खरेदी करणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.याशिवाय, पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या पॅसेंजर आणि मालवाहतूक वाहनांचे ईव्ही बॅटरीमध्ये रूपांतर (रेट्रोफिटिंग) केल्यास अशा वाहनधारकांनाही अनुदान दिले जाणार आहे.
आज झालेल्या कार्यक्रमात सुधीर चांदेकर, जयदेव तायडे, निलेश काळे, मुर्तजा शेख, संदीप वाघ , भोलानाथ निजामपूरकर या पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश वितरीत करण्यात आले.
राज्य व केंद्र शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त शहरात ई वाहन वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम येणाऱ्या १५०० ई-रिक्षाधारकांना महापालिकेच्या वतीने ३० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
– बाबासाहेब गलबले, सह शहर अभियंता, विद्युत विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोट :-
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत परवडणाऱ्या आणि स्वच्छ उर्जेचा वापर, संसाधनाचा सुयोग्य वापर आणि निर्मिती तसेच वातावरणीय बदलांना अनुरूप कृती ही उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका








