अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्र शेखर कुमार यांनी केली महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या संविधान भवनाच्या जागेची पाहणी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करणारे तसेच ज्ञान, एकात्मता आणि संसदीय लोकशाहीचे मूल्य जपणारे केंद्र म्हणून पिंपरी चिंचवड शहरात संविधान भवन उभारले जात आहे. या भवनाचा वापर आणि उपयोग सर्व घटकांना होण्यासाठी या भवनाची रचना सर्वव्यापी आणि दूरदृष्टीने तयार करावी, अशा सूचना केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्र शेखर कुमार यांनी दिल्या.



पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील पेठ क्र. ११ मधील मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या संविधान भवनाच्या ठिकाणाची पाहणी डॉ. चंद्र शेखर कुमार यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते.

या पाहणी दौऱ्यावेळी राज्य शासनाचे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश काळे, गणेश दानी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिलदत्त नरोटे, सुनिल सुर्यवंशी, भवनाचे प्रकल्प सल्लागार रमाकांत बुथडे, वास्तुरचनाकार योगेश राठी आदी उपस्थित होते.
डॉ. चंद्र शेखर कुमार म्हणाले, भारतीय संविधानामुळे आपला देश प्रगतीकडे झेपावत असून जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपले राष्ट्र ओळखले जाते. या संविधानाचा प्रचार प्रसार करून सक्षम पिढी घडविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून संविधान भवनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकार आर्थिक मदत करणार आहे. भविष्यात हे संविधान भवन लोकशाही तत्त्वांचा जागर करणारे दिशादर्शक माध्यम म्हणून उदयास येईल, या दृष्टीने या भवनामध्ये सुविधा आणि माहिती असली पाहिजे. ही केवळ वास्तू म्हणून उभारली न जाता अनेक नागरिक याठिकाणी ज्ञानवृद्धीसाठी आणि लोकशाही मूल्यांचे चिंतन करण्यासाठी येतील अशा दृष्टीने वास्तू उभारल्यास खऱ्या अर्थाने सार्थक होईल, असेही ते म्हणाले.
बांधकाम आणि आराखड्यामध्ये गुणवत्तेचे सर्वोच्च मानक राखून प्रकल्प विहीत वेळेत पुर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पर्यावरणास अनुकूल बांधकाम पद्धती आणि ऊर्जा-कार्यक्षम प्रणालींना प्राधान्य द्या, इमारतीच्या देखभालीसाठी आणि सुविधांच्या पुर्ततेसाठी कार्यक्षम योजनेची आखणी करा, गुणवत्तेचा दर्जा राखून भवनाच्या कामकाजात शाश्वत पद्धतींचा समावेश करा, अशा सूचना देखील डॉ. कुमार यांनी यावेळी दिल्या.
या भवनाची रचना विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि माध्यमे या लोकशाहीच्या चार स्तंभांच्या आधारावर करण्याचे प्राथमिक नियोजन आहे. एकूण २७ हजार १६९ चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या संविधान भवनामध्ये प्रशस्त वाहनतळ, विविध सभागृह, संग्रहालय उभारण्याचे नियोजन असून ई-वाचनालय, ऐतिहासिक दस्तावेज, कार्यशाळांसाठी सुसज्ज जागा आणि अत्याधुनिक सोयीसुविधांसह सज्ज दालने उभारण्याच्या दृष्टीने प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी यावेळी सांगितले.








