ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सेलेस्टियल नाईट’चे यशस्वी आयोजन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच ‘सेलेस्टियल नाईट’ या खगोलशास्त्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टीम अनंतम या महाविद्यालयाच्या रॉकेट्री आणि स्पेस रिसर्च टीम तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व कार्यकारी संचालक पार्थ बिरवटकर आणि व्यवस्थापकीय संचालक अथर्व शितोळे यांनी केले.
या कार्यक्रमाला ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दुर्बिणींच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी शुक्र, गुरू व त्याचे चार चंद्र, शनी व त्याच्या कड्या, तसेच चंद्राचे अविस्मरणीय दर्शन घेतले.
विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा अनुभव देण्यासाठी आणि अवकाश विज्ञानाची गोडी लागावी या उद्देशाने ‘सेलेस्टियल नाईट’ सारख्या कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार आहे अशी माहिती टीम अनंतमने दिली.
टीम अनंतम ही महाविद्यालयातील एक नवी रॉकेट्री आणि स्पेस रिसर्च टीम असून, ती अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. या टीमला डॉ. केतन देसले यांनी मार्गदर्शन केले.
पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थी आणि इतर सहभागींचे या स्वागत केले.








