गेल्या दोन महिन्यांत सुमारे ३६ हजार अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि किऑक्स हटविले


अनधिकृत फलकांविरोधात महापालिकेची कारवाई तीव्र



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई तीव्र केली असून गेल्या दोन महिन्यांत सुमारे ३६ हजार अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि किऑक्स हटविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अनधिकृत फलकधारकांकडून आतापर्यंत सुमारे ४७ हजार रुपये दंड वसूल केला असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात २ गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

१४ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पहिल्या मोहिमेमध्ये २८ हजार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्ज हटवण्यात आले. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या दुसऱ्या मोहिमेमध्ये अतिरिक्त ८ हजार अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत.
अनधिकृत फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेस तसेच शहरातील पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. शहरात स्वच्छ पर्यावरणपूरक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून यापुढेही अनधिकृत फलकांवर कारवाई सुरूच राहणार आहे. यामध्ये नागरिकांचे आणि विशेषत: फलकधारकांचे सहकार्य महत्वाचे असून त्यांनी महापालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
शहरातील फलकांबाबतच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी फलकधारक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. फलकधारक आणि महापालिका यांच्यामध्ये समन्वय राखणे आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हा यामागचा उद्देश आहे. दंडात्मक कारवाईसमवेत नागरिकांच्या सुरक्षिततेला केंद्रबिंदू ठेऊन संभाव्य धोक्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवरही महापालिका लक्ष केंद्रित करून विविध उपाययोजना राबवित आहे. याद्वारे जाहिरातदार आणि नागरिकांमध्ये जागरूकता तर वाढेलच शिवाय जबाबदारीची जाणीव होऊन नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासही मदत मिळेल.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपआयुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग
महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली कारवाई आणि पुढील नियोजन –
• (१४ ते २१ ऑक्टोबर) – २८ हजार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्ज हटविले.
• (२७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर) – निवडणूकीनंतर अतिरिक्त ८ हजार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज हटविले.
• दंडात्मक कारवाई – ४७ हजार रुपये दंड वसूल
• कायदेशीर कारवाई – नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध २ गुन्हे दाखल
• कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून पुढील दोन आठवड्यांचा कृती आराखडा तयार करणार








