ताज्या घडामोडीपिंपरी
“नववर्षाच्या स्वागतोत्सवात अंमली पदार्थांवर आळा घालावा!” – ॲड. सतिश गोरडे


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “नववर्षाच्या स्वागतोत्सवात अंमली पदार्थांवर आळा घालावा!” असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ आणि विश्व हिंदू परिषद, विधी प्रकोष्ठाचे वतीने,पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी पोलीस आयुक्त, पुणे व पोलीस आयुक्त पिंपरी – चिंचवड यांना केले.
शिक्षणाचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील अल्पवयीन तरुण – तरुणींना अगदी सहजपणे अंमली पदार्थ उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २०२५ या नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने महाविद्यालयातील तरुण आणि तरुणी कुतूहल अन् आकर्षणापोटी अंमली पदार्थांच्या वाट्याला जातात. ही बाब हेरून तरुण पिढीला अंमली पदार्थ सहज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणून अंमली पदार्थांची निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणार्या ड्रग्ज पेडलर (Drugs Paddler) इसमांद्वारे होण्याची दाट शक्यता आहे. यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) राबवावे अशी विनंती पोलीस आयुक्त, पुणे कार्यालयाला मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील बालेवाडी हाई स्ट्रीट, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन, इराणी वस्ती, शिवाजीनगर स्टेशन, डॉ. डी. वाय. पाटील आणि एम. आय. टी. महाविद्यालयांचे परिसर, अप्पर सुपर इंदिरानगर मस्जिद, सॅलिसबेरी पार्क ही अंमली पदार्थ संवेदनशील ठिकाणे आहेत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दिनांक २५ डिसेंबर ते ०१ जानेवारी या कालावधीत शोध मोहीम राबवून या संदर्भातील दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी विनंतीवजा आवाहन करण्यात आले असून या पत्राच्या प्रती नागपूर हिवाळी अधिवेशन २०२४ मुख्यमंत्री कार्यालय – नागपूर, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री कार्यालय – मुंबई, पोलीस महासंचालक कार्यालय – मुंबई, एन सी बी ऑफिस – मुंबई येथे पाठविण्यात आल्या आहेत.
ॲड. सतिश गोरडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना, भारतीय संविधानातील कलम ४७ – अ मध्ये अंमली पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवरील निर्बंधांविषयी तरतुदींनुसार राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा ऊहापोह करण्यात आला आहे, असे सांगून विश्व हिंदू परिषदेतील विधी प्रकोष्ठ याविषयी सामाजिक जाणिवेतून जागरूकता निर्माण करीत आहे, असेही सांगितले. सदरहू लेखी पत्रावर ॲड. सतिश गोरडे यांच्यासह विधी प्रकोष्ट संयोजक ॲड. शैलेश भावसार, सहसंयोजक ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव, ॲड. कृष्णा वाघमारे, ॲड. आशिष गोरडे, ॲड. सुशांत गोरडे, ॲड. महेश सोनवणे, ॲड. सौरभ साठे, ॲड. प्रसाद पवार, ॲड. ऋतुजा रणपिसे, ॲड. चित्रा मराठे आणि ॲड. आदित्य कोळपकर यांनी स्वाक्षरी केली आहे.








