सेवाधर्म हाच मानव धर्म – रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत


पुणे – (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले.



हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या २२ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु आहे. हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवाकार्याची माहिती सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, सामाजिक, धार्मिक संस्था, मठ मंदिरांच्या सेवाकार्याचा त्यात सहभाग आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी गोविंददेवगिरी महाराज, ज्योतिष तज्ञ लाभेश मुनीजी महाराज, इस्कॉनचे गौरांग प्रभू, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड.एस. के जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा आदी मान्यवर उपस्थित होते.

सरसंघचालक डॉ. भागवत पुढे म्हणाले की, सेवा करताना कायम प्रसिद्धी पासून दूर राहण्याचा आपला स्वभाव असतो. दिखाव्यासाठी सेवा न करता ती निरंतर करत राहणारे सेवेची कामना करतात.सेवेचा धर्म सांभाळताना अतिवादी न होता त्याचा मध्यम मार्ग आपण देशकाल परिस्थितीनुसार स्वीकारायला हवा. मानव धर्म हाच विश्वाचा धर्म असून तो सेवेतून प्रकट व्हावा. आपण विश्वशांतीसाठी घोषणा देतो मात्र अल्पसंख्यांकांची काय अवस्था इतरत्र आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तीन हजार वर्षापेक्षा अधिक परंपरा असलेले शस्त्र, वाचन, इतिहास,स्वभाव आपले आहे. ते पाहणे आणि अंगीकारणे, पुढील पिढ्यांना त्यातून प्रेरणा देणे यासाठी असे हिंदू सेवा महोत्सवासारखे उपक्रम आहेत.
पोट भरण्यासाठी आवश्यक ते केलेच पाहिजे पण गृहस्थाश्रमापलीकडे आपण जे जे मिळाले आहे ते सेवा रूपाने दुप्पट द्यायला हवे. जग आपले प्रतिपालक आहे.उपभोगाची वस्तू नाही हि भावना असेल तर परिवार समाज, गाव देश, राष्ट्र यांची मुक्त सेवा करण्याची प्रेरणा आणि अनुकरण आपण करावे. यासाठी अशा महोत्सवातून सेवाव्रत घेऊन चालूया असा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, भूमी समाज परंपरा यातून राष्ट्र बनते.पुण्याच्या भूमीची सेवा छ. शिवाजी महाराजांनी केली असून राजमाता जिजाऊ यांनी पुण्यभूमीत गणेशाची स्थापना केलेली आहे.सर्व संस्कारांचे शिखर सेवा असून सेवा हि पूजा आहे. दानाचा अर्थ माझ्याजवळ जे आहे त्यातील दान हे शेअरिंग असून उपकार नाही.नव्या पिढीत भाव जागरणाचे काम या हिंदू सेवा महोत्सवातून होणार आहे.
इस्कॉनचे प्रमुख गौरांग प्रभू यांनी हिंदू सनातन धर्माअंतर्गत परोपकार, आचारविचार आणि साक्षात्कार हे ३ मुद्दे येतात. ते एकमेकांशी एकरूप झाले की आत्मसाक्षात्कारातून आपण त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. हिंदू, जैन, बौद्ध, शीख यातील कोणीच वेगळे नाही सर्व एकच आहेत.असे सांगितले. तर लाभेश मुनी महाराज यांनी आपल्या गौरवशाली धर्माचा आत्मा एकच असून सेवाकुंभ सुरु झाला आहे.येणाऱ्या पिढ्यांना संस्कृतीची परिभाषा सांगताना हिंदू सेवा महोत्सव अग्रस्थानी असेल. असेही ते म्हणाले.
यावेळी गुणवंत कोठारी यांनी देशभरात सुरु असणाऱ्या हिंदू सेवा महोत्सव आणि त्याची गरज याविषयी माहिती दिली. कृष्णकुमार गोयल यांनी प्रास्ताविक केले. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा यांनी स्वागत केले. सुनंदा राठी आणि संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. पसायदानाने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली. यावेळी मूक बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या.








