चिंचवडमध्ये हजारो मोरया भक्तांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण संपन्न


चिंचवड देवस्थान ट्रस्ट, संस्कृती संवर्धन विकास महासंघ व स्थानिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन



श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचा ४६३वा संजीवन समाधी सोहळा

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ओम नमस्ते गणपतये… ओम गणपतये नमः … ‘मोरया, मोरया’च्या जयघोषाने हजारो मोरया भक्तांनी पहाटे एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, संस्कृती संवर्धन विकास महासंघ व स्थानिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या अथर्वशीर्ष पठणचे आयोजन करण्यात आले होते.
गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी व अनेक शाळकरी मुलांनी सकाळच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. अथर्वशीर्ष पठण महिलांसह पुरुषांनी आणि शाळकरी मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला. पारंपरिक पेहरावातील भक्तांनी सकाळपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी गर्दी केली होती. महिलांनी ॐकार जप आणि अथर्वशीर्षाची ११ आवर्तने करीत गणरायाला नमन केले.
या प्रसंगी आयोजित अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाने भक्तांच्या मनात अध्यात्मिक उर्जा निर्माण केली. कार्यक्रमाची सुरुवात मंत्रमुग्ध करणाऱ्या शंखनादाने झाली. त्यानंतर हिंदू धर्माच्या महत्त्वावर विचारमंथन करणारे व्याख्यान देण्यात आले. अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात अनेक वयोगटातील भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी श्रींची आरती करण्यात आली आणि पुन्हा शंखनादाने या मंगल सोहळ्याची सांगता झाली.
या अध्यात्मिक कार्यक्रमामुळे भाविकांना भक्तीमय वातावरणाचा अनुभव मिळाला. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि संस्कृती संवर्धन विकास महासंघ व स्थानिक शाळा समन्वयामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.








