विमा सखी योजना महिलांना स्वावलंबी बनविण्यात महत्त्वाचे योगदान देईल – आमदार शंकर जगताप


पिंपरी-चिंचवडमध्ये विमा सखी योजनेचा शुभारंभ



महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी नवा मार्ग

पिंपळे गुरव,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला एलआयसीचा विमा सखी योजने मुख्य उद्देश महिलांना विमा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. महिलांना मानधनासह रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून त्यांना समाजात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वाचे योगदान देईल, असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या एलआयसीच्या विमा सखी योजना पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच लागू करण्यात आली असून, याचा शुभारंभ पिंपळे गुरव येथील आमदार शंकर जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची नोंदणी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका उषाताई मुंढे, सामाजिक कार्यकर्ते नितीन इंगवले, बुद्धिजीवी सेलचे अध्यक्ष मनोजकुमार मारकड, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास आघाडीचे जिल्हा संयोजक भारत मदने, शुभम नखाते, तसेच एलआयसीचे अधिकारी प्रमोद ढोणे आणि महेश पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
नारी शक्ती हा आपल्या देशाच्या प्रगतीचा कणा आहे. विमा सखी योजना महिला सक्षमीकरणासाठी मोठे योगदान देईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला विकासाच्या दृढ संकल्पाला बळकट करेल,” असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
विमा सखी योजना ही केंद्र व राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या उपक्रमांच्या मालिकेतील एक महत्त्वाचा भाग आहे. लेक लाडकी योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, सुकन्या योजना, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे आज महिलांना विविध क्षेत्रात पुढे जाण्याचे मार्ग उघडले आहेत. या योजनांमधून प्रेरणा घेऊन विमा सखी योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांनी केवळ आर्थिक स्थैर्य प्राप्त करणेच नव्हे, तर इतर महिलांना आर्थिक योजनांची माहिती पोहोचवून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची जबाबदारीही पार पाडावी, असे आवाहन कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे पिंपरी-चिंचवडमधील महिलांना रोजगार व आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू होण्याची आशा आहे.








