पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) यांच्यामध्ये सामंजस्य करार


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराचे बदलते हवामान, प्रदूषण व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्यांचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन करताना राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. हवामान बदलातील विविध आव्हाने सक्षमपणे हाताळण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे.



निगडी येथील दुर्गादेवी टेकडी येथे हवामान बदलाचे संकेत देणारा अत्याधुनिक एक्स-बॅंड डॉप्लर वेदर रडार मनोरा उभारण्यात येणार आहे. याठिकाणी निश्चित केलेल्या जागेची पाहणी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पुणे येथील भारतीय हवामान विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता मनोज सेठिया, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उद्यान अधीक्षक योगेश वाळूंज तसेच भारतीय हवामान विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ उदय शेंडे, डॉ. शिजो झकारिया, अश्विन राजू डी.के आदी उपस्थित होते. रडार प्रणाली उभारण्यासाठी महापालिकेद्वारे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून हवामान विभागामार्फत त्या ठिकाणी रडार उभारण्यात येणार आहे.

जागतिक स्तरावरील हवामान झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बदलते हवामान आणि त्यामुळे उद्भवणारी आपत्ती यावर संरचनात्मक उपाय योजना करण्यासाठी तसेच शहराच्या शाश्वत विकासासाठी हवामान व वातावरणीय बदलाच्या माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी दोन्ही संस्थामध्ये झालेला सामंजस्य करार भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. या करारानुसार भारतीय हवामान खाते पिंपरी चिंचवड महापालिकेला वेळोवेळी शहरातील हवामानाचे अंदाज तसेच त्याबाबत करावयाच्या उपाय योजना याबाबत सूचना देणारी माहिती पुरवणार आहे. या माहितीच उपयोग महापालिकेला विविध उपाय योजना आणि नियोजन करण्यासाठी होणार असल्याचे आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
“एक्स-बॅंड डॉप्लर वेदर रडार” एक अत्याधुनिक स्वदेशी रडार प्रणाली आहे. या प्रणालीचे कार्यपरिक्षेत्र सुमारे १०० किलोमीटर परिघात असणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्राचे, गड परिसर आणि आसपासच्या भागांचे समावेश असणार आहे. आपत्तीजनक हवामान घटनांची वास्तविक-समय निरीक्षण क्षमता, अत्याधिक पाऊस, वादळ, गारपीट, इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी या रडारप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहरावर परिणाम करणाऱ्या वातावरणीय घटकांची माहिती महापालिकेला वेळोवेळी पुरवली जाणार असल्याचे के.एस.होसाळीकर यांनी यावेळी सांगितले.








