महापालिका शाळांमध्ये आता माजी सैनिकांचा “वॉच”


– आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेची सकारात्मक अंमलबजावणी
– बदलापूर येथील अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये आता माजी सैनिकांना सुरक्षेसाठी ‘तैनात’ करण्यात येणार आहे. महापालिका स्थायी समितीमध्ये संबंधित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये करार तत्वावर कार्यरत असलेल्या 370 सुरक्षारक्षकांना कामातून कमी करून त्या ठिकाणी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) चे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला होता. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड आली होती.
दरम्यान, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली आणि कंत्राटी कामगारांचा रोजगार हिरावून घेऊ नये. तसेच, प्रत्येक शाळेमध्ये एक माजी सैनिक तैनात करावा. त्यांच्या माध्यमातून सुरक्षेची जबाबदारी निश्चित करावी, अशी सूचना करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त शेखर सिंह यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे.
कंत्राटी सुरक्षारक्षकांनी मानले आभार!
गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या एम.के.सेक्युरीटी, सैनिक इंटेलिजन्स सेक्युरीटी, क्रिस्टल सेक्युरीटी, नॅशनल सेक्युरीटी सर्विसेस या संस्थांच्या कामगारांना कर्तव्यातून मुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे 370 कंत्राटी कामगार सुरक्षारक्षकांच्या रोजगाराचा निर्माण झालेला प्रश्न आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी करून सोडवला. त्यामुळे कंत्राटी कामगार वर्गाने आमदार लांडगे यांचे आभार मानले आहेत.








