सहयोगनगर- तळवडेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारणार मोनोपोल!


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तळवडेतील सहयोगनगर येथील वाहतुकीच्या रस्त्यामध्ये 40 वर्षांपासून असलेला टॉवर अखेर हटविण्यात येणार आहे. त्याजागी मोनोपोल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र निविदेला महानगरपालिका स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.



मोनोपोल कमी जागेत उभारल्याने सहयोगनगर ते त्रिवेणीनगर दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील सहयोगनगर येथे वाहतुकीच्या रस्त्यामध्ये महापारेषणाचा अतिउच्च दाबाचा (220 kv EHV line) टॉवर सुमारे 40 वर्षांपासून कार्यरत आहे. तळवडे ही औद्योगिक वसाहत तसेच आयटी पार्क असल्यामुळे लोकवस्ती व वाहतूक कोंडी येथे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. टॉवरवरील वीजवाहिनी ही 220 केव्ही एचव्ही या क्षमतेची आहे. या मनो-याच्या खालून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरु आहे.
दरम्यान, महापारेषण कंपनीने हा रस्ता बंद करण्याबाबत वारंवार कळविले. परंतु, हा रस्ता वाहतुकीचा असून तांत्रिक कारणांमुळे बंद करणे शक्य नसल्याचे स्थापत्य विभागाने कळविले आहे. हा मनोरा स्थलांतर करुन रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहतूक सुरळीत करण्याकरिता सद्यस्थितीत असलेला मनोरा (9.5 – 9.5 ) 50 मीटर पुढे किंवा मागे मोनोपोलद्वारे (3-3 मीटर) करावा. त्याप्रमाणे आवश्यक असलेला मनोका क्रमांक 33 ही स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस (3-3 मीटर) वाहतुकीस जागा उपलब्ध करण्याचा पर्याय समोर आला होता.
माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे नवीन मोनोपोल उभारणीची मागणी होती. तसेच, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार लांडगे यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्यानंतर प्रशासनाने कार्यवाही केली आणि या विषयाला मंजुरी दिली आहे. टॉवर काढण्यात येणार आहे. त्याजागी मोनोपोलची कमी जागेत उभारणी केली जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या निविदेला मंजुरी देण्यात आली. लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.
तळवडे- रुपीनगर भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. टॉवरमुळे सहयोगनगर ते त्रिवेणीनगर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होत होती. टॉवर खालून नागरिकांना ये-जा करावी लागत होती. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे टॉवर काढण्यासाठी आम्ही आग्रही मागणी केली. त्याला आमदार महेश लांडगे यांचे पाठबळ मिळाले. आता टॉवर काढून मोनोपोलची कमी जागेत उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
– शांताराम भालेकर, माजी नगरसेवक.








