नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी क्लायमेट बजेट काळाची गरज-चंद्रकांत इंदलकर


वातावरणीय अर्थसंकल्पबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वेगाने बदलणारे जागतिक हवामान, त्याचा पर्यावरण आणि मानवावर होणारा परिणाम लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल साधत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नियमित अर्थसंकल्पात पर्यावरणीय अर्थसंकल्पाचा समावेश करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५-२६ पासून नियमित अर्थसंकल्पासोबत पर्यावरणीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे आज पासून प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन करताना इंदलकर बोलत होते.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, लेखाधिकारी सुरेंद्र देशमुखे, अनिल पासलकर, चारूशीला जोशी, दीपक गायकवाड, सह शहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, उप आयुक्त राजेश आगळे, सीताराम बहुरे,सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पर्यावरणीय बदल तज्ञ प्रज्ञा ठाकूर, सल्लागार लिशा बेंदी, डॉ. जयदीप पुरोहित, पियुष भुसारी, इशा पानसे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरणाचा समतोल राखणे आणि संवर्धन करणे यासाठी जागतिक पातळीवर सर्वसमावेशक प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी भारताने देखील विविध आंतरराष्ट्रीय करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यानुषंगाने औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी महापालिकेच्या वतीने पर्यावरणीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे शहरातील पर्यावाराने संतुलना बरोबरच नागरिकांचे जीवनमान देखील उंचावण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी मांडले.
महापालिकेच्या विविध विभागाच्या वतीने शहरात विकासाच्या दृष्टीने विविध प्रकल्प उभारले जातात तसेच नागरिकांच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध उपक्रम,योजना, कार्यक्रम राबविले जातात. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये करण्यात येते. सन २०२५-२६ पासून विविध कामासाठी लागणारी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करताना संबंधित प्रकल्प, उपक्रमामध्ये पर्यावरणीय दृष्टीकोनातून कोणते मुद्दे, घटक महत्वाचे आहेत ते निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच निश्चित करण्यात आलेल्या पर्यावरणीय घटकांवर उपाय, योजना करण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक तरतूद देखील अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मूळ अर्थसंकल्पासोबतच पर्यावरणीय अर्थसंकल्प देखील प्रसिद्ध केला जाणार असल्याचेही मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण जैन यांनी सांगितले.
पर्यावरणीय अर्थसंकल्पासाठी अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण सत्र आज महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. ४,५आणि ६ डिसेंबर दरम्यान आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे संपन्न होत आहे.








