‘एमआयटी एडीटी’त रक्तदानाद्वारे “नशा मुक्त अभियाना”चा संदेश


पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सामाजिक जागृती आणि मानवतावादाचा अभूतपूर्व संदेश देत, येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात “नशा मुक्त अभियान” आणि रक्तदान शिबिर यासारख्या प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना रुजवण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न झाला.



कार्यक्रमाची सुरुवात एमआयटी इम्पॅक्ट स्टुडंट कौन्सिल आणि इलेक्टोरल लिटरसी क्लबने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करून केली. यानंतर “से नो टू ड्रग्स” या संदेशाने सुसज्ज जनजागृती रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या मोहिमेत समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यानंतर, विद्यार्थी व्यवहार कार्यालय व आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या (एएफएमसी) संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एनएसएस व एनसीसी सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. ज्यात 101 हून अधिक लोकांनी रक्तदान करून या उपक्रमास यशस्वी केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डाॅ.विपुल दलाल, एएफएमसी मेजर शाहीन खान भाटी, जयश्री मोदी तलसेरा, डाॅ.सुदर्शन सानप, डाॅ.सुराज भोयार, डाॅ.अतुल पाटील यांच्या उपस्थितीत झाले. तसेच, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. महेश चोपडे (रजिस्ट्रार) यांचे या उपक्रमासाठी मोठे सहकार्य लाभले.
कोट
रक्ताचा प्रत्येक थेंब हा जीव वाचवण्याचा आणि सशक्त समाज निर्माण करण्याचा संदेश देतो. आमचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी दाखवलेल्या एकात्मतेने आणि सेवाभावाने आजचा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला आहे. एमआयटी एडीटी कायमच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असते.
–प्रा.डाॅ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू








