विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आराखडा बैठक
थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्ताच्या आराखड्याबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी आज आढावा घेतला.
चिंचवड क्षेत्रात मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा नियोजन आराखड्याविषयी आढावा घेण्याच्या दृष्टीने थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील बापुजी बुवा सभागृहात बैठक संपन्न झाली. या बैठकीस चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, सेक्टर ऑफिसर्स समन्वय अधिकारी अजिंक्य येळे, आचारसंहिता कक्षाचे समन्वय अधिकारी राजेंद्र डुंबरे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, विक्रम बनसोडे, महेश बनसोडे, नितीन फटांगरे, निवृत्ती कोल्हटकर, कन्हैया थोरात आणि शैलेश शिंदे तसेच संबंधित कक्षाचे समन्वय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अधिकाऱ्यांशिवाय मतदान केंद्रांच्या १०० मीटर आवारात कोणासही मोबाईल आणण्यास प्रतिबंध असल्याने मतदार, उमेदवारांचे प्रतिनिधी आदींना याबाबत अवगत करावे आणि नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर नियमाधिन राहून कारवाई करावी. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रे अशी आहेत ज्या ठिकाणी मतदारांची संख्या जास्त आहे. अशा मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेची सोय करण्यात यावी जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखून मतदान प्रक्रिया अविरतरपणे सुरू राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे मतदान केद्रांच्या प्रवेशद्वारावर आवश्यक सुरक्षा ठेवावी आणि रस्त्यावरील रहदारीस किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदानासाठी येणारे नागरिक वाहने कोठेही उभी करणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी आणि पार्किंगचे योग्य नियोजन करावे.
मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल झाल्याबाबत मतदारांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले असून बदललेल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी दर्शनी भागात बदललेल्या ठिकाणाबाबत मार्गदर्शक फलकही लावण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे त्यामुळे मतदान केंद्राच्या आवारात मोबाईल वापरास बंदी असलेला फलक देखील लावण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार असून एनएसएस, एनसीसी आणि एमएसएफचे जवानही आवश्यक मतदान केंद्रांच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी यावेळी दिली.
*निवडणूक निर्णय अधिकारी*
*२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ*