ताज्या घडामोडीपिंपरी

मतदारांना पिण्यासाठी ५ लाख पाणी बॉटल; शहरात १५ हरित मतदार केंद्र स्थापित करणार 

Spread the love

 सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामकाज करावे- अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – महापलिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर इतिहासात पहिल्यांदाच  महापालिकेच्या वतीने मतदारांना पिण्यासाठी सुमारे ५ लाख पाणी बॉटल्स उपलब्ध करून देण्यात येणार असून सुमारे ३०० सुरक्षारक्षक कर्मचारी, २५० महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, १५ हरित मतदान केंद्र, आपत्कालीन विद्युत व्यवस्था, मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था आदी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली असून यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामकाज करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.

       सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश पुणे जिल्ह्याचे  निवडणूक निरीक्षक यांनी महापालिकेला दिल्या आहेत.  त्याअनुषंगाने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले.  यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक शाखेचे उपआयुक्त बापू बांगर, मुख्य अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, उमेश ढाकणे, निलेश भदाणे,  सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, मुकेश कोळप, विजयकुमार थोरात, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह कार्यकारी अभियंता, संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीमध्ये ८ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या सुमारे २७ ठीकाणी मतदारांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नोडल अधिकाऱ्यांनी संबधित मतदान केंद्रांवर उपस्थित सर्व यंत्रणांशी समन्वय ठेऊन सोपविण्यात आलेले कामकाज करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी बैठकीत दिले. यामध्ये  ८ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ११ ठिकाणे आहेत, पिंपरी विधानसभा मतदारसंघात  एकूण ४ ठिकाणे तर भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण १२ ठिकाणे असून महापलिकेच्या वतीने शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी सांगितले.

 मतदारांना पिण्यासाठी ५ लाख बॉटल्स

पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदार संघातील सर्व मतदार केंद्रांवर मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून मतदानासाठी  रांगेत उभे असलेल्या मतदारांना महापालिकेच्या वतीने सुमारे ५ लाख पाणी बॉटल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मतदान केंद्रांवर मंडप व बैठक व्यवस्था

शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांना बसण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असून त्यासाठी बेंच आणि खुर्च्यांची व्यवस्था महापालिकेच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक ठिकाणी मंडप व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.

हरित मतदान केंद्र स्थापन

पिंपरी, भोसरी आणि चिंचवड अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ५ असे एकूण १५ हरित मतदार केंद्र स्थापित करण्यात येणार असून याठीकाणी मतदारांना विविध वनस्पती माहितीसह ठेवण्यात येणार असून पर्यावरणपूरक संसाधने याबाबत माहिती देणारे आकर्षक सचित्रफलक लावण्यात येणार आहेत.

आपत्कालीन विद्युत व्यवस्था*

सर्व मतदान केंद्रांवर विद्युत व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत विद्युत जनरेटरची सोय देखील करण्यात येणार आहे.  त्याबाबत सर्व मतदान केंद्रांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मतदान केंद्रांवर अतिरिक्त सफाई कामगारांची नियुक्ती

 शहरातील मतदार केंद्रांवर स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असून मतदान केंद्राचा परिसर, स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ करण्याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

भव्य पार्किंगची व्यवस्था

सर्व मतदार केंद्रांवर महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या समन्वयाने भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून नागरिकांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी मार्गदर्शक फलक देखील लावण्यात येणार आहेत.

सुरक्षा रक्षक, एमएसएफ जवान नियुक्त

महापलिकेच्या वतीने सर्व मतदार केंद्रांवर एकूण ३०० सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार असून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुमारे २५० जवान तैनाद करण्यात येणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी देखील मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत.

एनसीसी स्वयंसेवक नियुक्त

शहरातील विविध महाविद्यालयातील एनसीसी स्वयंसेवक आवश्यकतेनुसार  मतदार केंद्रांवर नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २७० एनसीसी स्वयंसेवक महापालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात येणार आहेत.

 मतदान केंद्रांवर दिशादर्शक व स्थळदर्शक फलक, कलर कोडींग व्यवस्था

मतदान केंद्रावरील उपलब्ध सोयीसुविधांबाबत मतदारांना स्पष्ट बोध होण्यासाठी स्थळदर्शक व दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून एकाच  ठिकाणी जास्त मतदान केंद्र असलेल्या ठीकांणी मतदारांना आपल्या मतदान केंद्राचे स्पष्ट बोध होण्यासाठी “कलर कोडींग” करण्यात येणार आहे.

अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी अतिरिक्त गेट निर्मिती*  

शहरात एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठीकाणी मतदारांना येण्या-जाण्यासाठी एकच गेट असल्यास अशा ठीकाणी आवश्यकतेनुसार नव्याने अतिरिक्त गेट निर्माण करण्यात येणार आहेत.

मतदान केंद्राच्या ठिकाणी किमान सुविधा उपलब्ध करून देताना कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी तसेच  सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून कामकाज पार पाडावे. – प्रदीप जांभळे पाटील (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button