‘व्होट हिंदुत्व’ पुढे नेण्यासाठी महेश लांडगे यांचा विजय गरजेचा : मिलिंद एकबोटे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकसभेमध्ये ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ चालवली गेली. ज्यामध्ये क्रूरकर्मा अजमल कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवलेल्या सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्यासारख्या व्यक्तीलाही पराभूत केले. म्हणूनच विधानसभेला सतर्क होऊन आपल्याला ‘व्होट हिंदुत्व’ पुढे न्यायचे आहे. पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून सांगतोय गोवंश जतन, हिंदू राष्ट्राभिमान आणि हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणाऱ्याला विजयी करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वाधिक मताधिक्य मिळालेला उमेदवार म्हणून महेश लांडगे यांचे नाव पुढे आले पाहिजे, असे आवाहन समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले.
भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चऱ्होली येथील वाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिलिंद एकबोटे बोलत होते. निर्धार मेळाव्या दरम्यान परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या आठ ते दहा वर्षातील झालेला बदल नागरिकांनी यावेळी आवर्जून नमूद केला. गेल्या दहा वर्षात या परिसरात झालेल्या सुविधांमुळे हा परिसर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडला गेला आहे, असेही आवर्जून नमूद केले.
मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की, ही निवडणूक नेहमीसारखी नाही. हे महायुद्ध आहे. शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे आपली भूमिका घ्यावी लागेल. परिस्थिती तशीच आहे..लोकसभेत सरकारी वकील उज्वल निकम सारख्या व्यक्तीमत्वाला पराभव पत्करावा लागला. कारण ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ चालवली गेली. आता आपल्याला एकजूट करून व्होट हिंदुत्व पुढे न्यायचे आहे. आम्ही जातीभेद मानणारे नाही. आम्हाला “सर्व हिंदू समभाव” हे एकच तत्व मान्य आहे. म्हणून ‘व्होट जिहाद’ नावाची सुक्त चळवळ लाथाडून ‘व्होट हिंदुत्व’ पुढे न्यायचे आहे. म्हणून आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की आमचे मत हे आमच्या भारत मातेसाठी असणार आहे.
महेश लांडगे यावेळी म्हणाले की, काही लोकांची राजकीय नाती असतात.राजकारणातल्या स्वार्थासाठी ही नाती तयार होतात. मी 2014 पासून या मतदारसंघांमध्ये माझी जिव्हाळ्याची नाती तयार केली. ही नाती तयार करताना एक एक माणूस जपताना मी काय कष्ट घेतले हे माझे मला माहिती आहे. ज्यांच्या घरात पिढीच्यात राजकारण आहे त्यांना याचे मोल वाटणार नाही. एका मर्यादेपर्यंत राजकारण ठीक आहे. राजकारणातील संस्कृती जपली पाहिजे मात्र काही लोक आपल्या अति महत्वकांक्षामुळे या संस्कृतीला विसरले आहेत.
निर्धाराची नव्हे, ही तर विजयाची सभा…
आमदार महेश लांडगे यांना तिसऱ्यांदा आमदार करताना महाराष्ट्रभर अशी बातमी फिरली पाहिजे की महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांपैकी सर्वाधिक लीड आपल्या प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महेश लांडगे यांनी मिळवले आहे. यासाठी हिंदू म्हणून तुमच्या मनगटातील रग मी बोलून दाखवतोय. तुमच्या भावना माझ्या तोंडातून व्यक्त होत आहेत. एक हिंदू म्हणून ही संधी तुम्हाला मिळत आहे ही संधी नक्की गमावू नका असे आवाहन मिलिंद एकबोटे यांनी यावेळी केले. चऱ्होलीतील आजच्या सभेची गर्दी पाहून एकबोटे यांनी ही निर्धाराची नाही तर विजयाची सभा आहे, असे देखील म्हटले.
काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली ‘स्वाभिमान हरपला’ .. स्वाभिमान हरपला की आणखी काही , याला महेश दादांच्या विजयी सभेत नक्की उत्तर देईन. मागच्या दोन टर्मला महेश दादांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. या दोन्ही वेळी महेश लांडगे यांना निर्णायक मतदान चऱ्होली येथून मिळाले होते. आताही येथून मिळणाऱ्या मतदानातून महेश लांडगे यांची यंदाची हॅट्रिक फिक्स आहे.
– नितीन काळजे, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड.