ताज्या घडामोडीभोसरी

आगामी काळात दिघीचा सर्वंकष विकास करणार – अजित गव्हाणे

Spread the love

 

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वर्षभराचे साधारण ८ हजार चारशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. यातून दिघी गावाला किती निधी मिळाला. आज दिघीमध्ये खेळाचे मैदान, जलतरण तलाव, उद्यान, कुस्तीचा आखाडा, बैलगाडा घाट अशी एकही सुविधा न पुरवणाऱ्यांना दिघीमधील नागरिकांकडून मत मागण्याचा नैतिक अधिकारच नाही असे अजित गव्हाणे म्हणाले. आगामी काळात दिघीमध्ये या सर्व सुविधा पुरवण्याची ग्वाही यावेळी अजित गव्हाणे यांनी दिली.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 9) दिघी परिसरात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मारुती भैरवनाथ मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी माजी सरपंच साहेबराव वाळके, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, संतोष वाळके ,सुधाकर भोसले, प्रभाकर कदम, संतोष तानाजी वाळके, कृष्णाजी वाळके, ज्ञानेश्वर वाळके, ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर महादेव वाळके, मनोज परांडे ,राजेंद्र तापकीर आदी उपस्थित होते. दिघी परिसरातील आदर्श मित्र मंडळ, नेहरू तरुण मित्र मंडळ, त्रिमूर्ती मंडळ मार्गे मारुती भैरवनाथ मंदिर ते दिघी गावठाण कॉलनी नंबर एक ते बारा, विजयनगर, काटे वस्ती गायकवाड नगर, शिवरत्न कॉलनी, चौधरी पार्क येथील नागरिकांशी अजित गव्हाणे यांनी संवाद साधला.

अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे वर्षाचे साधारण 8 हजार चारशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. मात्र यातील किती निधी सत्ताधाऱ्यांनी या भागासाठी आणला. गेल्या दहा वर्षात दिघी परिसरामध्ये खेळाचे मैदान, स्विमिंग पूल ,उद्यान ,कुस्तीचा आखाडा, बैलगाडा घाट यापैकी कोणती सुविधा मिळाली हा विचार नागरिकांनी केला पाहिजे. विशेष म्हणजे सत्ताधारी कोणत्या तोंडाने या नागरिकांकडे मते मागायला येतात.

अजित गव्हाणे पुढे म्हणाले आपण समोरच्यांना गेली दहा वर्ष संधी दिली. मात्र त्यांनी या संधीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला. दिघी परिसर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नंतर समाविष्ट झाला. या भागामध्ये स्वातंत्र्यसैनिक, आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या भागामध्ये संरक्षण खात्याचे अनेक उपक्रम आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांनी या परिसरात वास्तव्याला पसंती दिली. आपले वास्तव्य वाढवले. देशाची सेवा करणाऱ्या या नागरिकांना गेल्या दहा वर्षात कोणत्या सुविधा मिळाल्या.
यापूर्वीचे हवेली आणि त्यानंतर नव्याने निर्मित झालेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघावर माजी आमदार विलास लांडे यांनी काम पाहिले. त्यांनी एका रुपयाचाही भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महापालिकेत केला नाही. आमदारांनी आम्हा नगरसेवकांच्या कामात कधी अडथळा निर्माण केला नाही. नाहक लुडबुड केली नाही. या शहराला यशवंतराव चव्हाण, प्रा. रामकृष्ण मोरे यांचा वारसा लाभला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या शहराला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र याच शहराचे नाव मलिन करण्याचे काम गेले दहा वर्षात झालेले आहे. अशी टीका अजित गव्हाणे यांनी केली.

२४x७ योजनेचे पुनरुज्जीवन करणार

माजी आमदार विलास लांडे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना २४x७ योजना पुढे आणली. मात्र गेल्या दहा वर्षात राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या योजनेचे मातेरे झाले.भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी सुद्धा म्हणाले होते. नागपूर आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ही योजना आणली गेली.मात्र नागपूरमध्ये ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली व पिंपरी चिंचवडमध्ये बारगळली. एका चांगल्या योजनेचे अपुऱ्या इच्छाशक्तीच्या अभावी वाटोळे झाले.आगामी काळात या योजनेचे पुनर्जीवन करणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.

रस्त्याच्या कामावरून श्रेय लाटणाऱ्या विरोधकांना टोला

दोन दिवसांपूर्वी विरोधक म्हणाले ज्या दिही रस्त्यावरून तुम्ही येता तो रस्ता आम्ही केला. मात्र येथील जनता सुज्ञ आहे. वाळके परिवाराने या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेतला. माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी या रस्त्यासाठी सरकार दरबारी किती खेटे घातले हे त्यांना आणि मला माहित आहे. विरोधकांनी कितीही खटाटोप केला तरीही खरे लपून राहणार नाही असा टोला अजित गव्हाणे यांनी लगावला.

चक्क घोड्यावरून प्रचार दौऱ्यात सहभाग

महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी दिघी परिसरातील प्रचार दौऱ्यामध्ये आज चक्क घोड्यावर स्वार होऊन नागरिकांशी संवाद साधला. अजित गव्हाणे यांची घोड्यावर बसून झालेली ही ”एन्ट्री” अतिशय लक्षवेधी ठरली. आजच्या प्रचार दौऱ्यामध्ये दिघीकरांनी बैलगाडी देखील आणली होती. फुलांनी सजवलेली बैलगाडी आणि त्यावर मध्यभागी ठेवण्यात आलेले तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लक्ष वेधून घेत होते.

प्रचाराच्या निमित्ताने दिघी परिसरात गर्दीचा उच्चांक

महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी दिघी परिसरामध्ये प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांच्या गर्दीचा उच्चांक पाहिला मिळाला. यावेळी जेष्ठ नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. यावेळी अजित गव्हाणे यांनी नागरिकांना उद्देशून कोणाला घाबरायचे नाही. मात्र माऊली तुकोबांचे विचार जपणारी आपली पिढी आहे. आपली वागणूक नम्रपणाची ठेवून परिवर्तनाची भूमिका ठाम ठेवायची आहे असे देखील गव्हाणे म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button