दिवाळीनिमित्त वैयक्तिक भेटीवर कलाटे यांचा भर – राहुल कलाटे यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी
– राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मतदारांसोबत संवाद
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सर्वत्र दिवाळीची धामधूम, उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. मात्र राजकीय चर्चा मतदारसंघातील नेत्यांभोवती सुरु असताना महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी दिवाळी निमित्त मतदार आणि मतदारसंघातील जुन्या जाणत्या नागरिकांच्या सदिच्छा भेटीपासून प्रचाराची सुरुवात केली आहे.
चिंचवड मतदारसंघात स्थानिक आणि नोकरी उद्योगासाठी बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या नागरिक एकत्र राहतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार आणि जुने अनेक कार्यकर्ते इथे आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर कार्यकर्ते आणि मतदार बहुंसख्येने शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे कलाटे यांनी कार्यकर्ते, पक्षाचे मतदारसंघातील जुने जाणते, मतदार यांच्या भेटी गाठी घेत संवाद साधण्यावर भर दिला. सर्वांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.
कलाटे यांनी गुरुवारी (ता. ३१) पायाला भिंगरी लावत पंचक्रोशीतील विविध गावांचा वेगवान दौरा केला. गाठीभेटी व बैठकांचा धडाका लावत सर्वांशी हितगुज केले. जुन्या जाणत्या ग्रामस्थांचे मार्गदर्शन घेतले. रहाटणी, पूनावळे, थेरगाव, वाकड, चिंचवड आदी गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन त्यांनी स्थानिक मतदार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी केल्या.
ज्येष्ठ नेते माजी खासदार विदुरा तथा नाना नवले यांचीही त्यांनी भेट घेऊन मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले. सकाळी लवकर सुरू केलेल्या या भेटीगाठी दरम्यान त्यांचे जागोजागो जल्लोषात स्वागत झाले. सुहासिनींनी औक्षण केले, पेढे भरवून स्वागत करण्यात आले. यावेळी चिंचवड विधानसभेचा आश्वासक आणि चौफेर विकास साधण्यावर कलाटे यांनी भाष्य केले.
दिवाळीचा शुभ उत्सव सुरू झालेला आहे. सर्वांना शुभेच्छा दिल्या. आज भेटीगाठीवर भर दिला आहे. चिंचवडच्या पुढच्या ५० वर्षांचा विचार करून सुनियोजित विकासाचा आमचा संकल्प आहे. भूमीपुत्र म्हणून मला परिसराची संपूर्ण माहिती आहे. नगरसेवक म्हणून मी योग्य विकासकामे करून दाखवली आहेत. भूमीपुत्रांना न्याय मिळवून देत इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सुनियोजित विकासाची आवश्यकता आहे. त्यासाठी काम करण्याचा माझा संकल्प आहे.
– राहुल कलाटे
उमेदवार महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उच्चशिक्षित व अभ्यासू नेतृत्व असलेले राहुल कलाटे हे चिंचवडचा सूनियोजित व आश्वासक विकास साधतील. कलाटे हे सर्वसामान्यांचे व तळमळीचे नेते आहेत. त्यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यामुळे अशा अष्टपैलू नेत्याच्या हातात चिंचवड विधानसभेचा कारभार द्यायला जनता उत्सुक आहे. त्यांचा विजय निश्चित आहे.
– मच्छिन्द्र तापकीर
माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष