ताज्या घडामोडीपिंपरी

“मराठी मुळातच अभिजात भाषा!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “नुकताच अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेली मराठी मुळातच अभिजात भाषा आहे. प्राचीन काळापासून संतसाहित्यासह वैविध्यपूर्ण साहित्याच्या समावेशामुळे ती समृद्ध झाली आहे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित दिलासा व्हॉट्सॲप समूहावर वर्षभर साप्ताहिक सदरलेखन करणार्‍या लेखकांचा सन्मान करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. माजी नगरसेवक सुरेश नढे – पाटील अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांच्या मातोश्री सविता दशरथ गायकवाड, दिलासाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची व्यासपीठावर; तर ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रा. डॉ. धनंजय भिसे, सुहास घुमरे, जयश्री श्रीखंडे, वर्षा बालगोपाल, सुलभा सत्तुरवार, नीलेश शेंबेकर, हेमंत जोशी, नामदेव हुले, सोमनाथ लोंढे, सतीश अवचार, किरण इंगवले, गोपाळ खोंड यांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, राधाबाई वाघमारे, नारायण कुंभार, डॉ. पी. एस. आगरवाल, कैलास भैरट, शामला पंडित या सदरलेखन करणार्‍या लेखकांना सन्मानित करण्यात आले; तसेच  ऋतुराज गायकवाड यांचे वडील दशरथ गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “मराठी भाषेचा अभिजातपणा टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. विशेषत: लेखकांचे ते आद्यकर्तव्य आहे. या पार्श्‍वभूमीवर दिलासा साहित्य सेवा संघाचा सदरलेखनाचा वार्षिक उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे विविध विषयांवरील पुस्तकांची मराठी साहित्यात भर पडेल!”
दिलासा साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी गायलेल्या भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दिलासाचे कोषाध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी प्रास्ताविक केले. नारायण कुंभार यांनी सत्कारार्थी लेखकांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. शिवाजीराव शिर्के यांनी मनोगतातून आपली साहित्यिक वाटचाल मांडली. सुरेश नढे – पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
मुरलीधर दळवी, फुलवती जगताप, अण्णा गुरव, मारुती वाघमारे, संगीता सलवाजी यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button