मानसिक आरोग्य व्यवस्थापन काळाची गरज – प्रा. बाबासाहेब पवळ
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आजच्या या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस आपल्या अपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरतपणे धावतो आहे. मात्र हे धावणे त्याला सर्वच पातळ्यांवर समाधानी ठेवू शकत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य राखणे हे सर्वांपुढील आव्हान आहे, असे प्रतिपादन मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बाबासाहेब पवळ यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘१० ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, आपल्या क्षमतेनुसार स्वप्न पाहणे, त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे, आत्मविश्वास जागृत ठेवणे, सकारात्मक राहणे, अपयश पचविण्याची क्षमता ठेवणे, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे आणि प्रामाणिकपणा, नम्रता, सत्यता, सोज्वळता, अहिंसेवर भर दिल्यास मानसिक आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते.
सदर प्रसंगी मानसिक आरोग्य व्यवस्थापन संदर्भात चित्रपट दाखविण्यात आला. कार्यक्रमास कला शाखा प्रमुख डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. वैशाली खेडकर, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व उपस्थितांचे आभार डॉ. शितल जाधव यांनी मानले.