ताज्या घडामोडीपिंपरीपुणे
छायाचित्र समाजाचा आरसा – डाॅ.सुधाकर चव्हाण
‘एमआयटी एटीडी’त भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कुठलीही कला समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचे त्या आहेत, तसे दर्शन घडवत असते. त्यामुळे, छायाचित्र आणि चित्रकलेच्या माध्यमातून कलाकार समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असतो. अगदी तसेच आज विद्याद्यार्थ्यांची छायचित्रे पाहूण सदर ठिकाणांचा प्रत्यक्ष फेरफटका मारून आल्यासारखे वाटले, असे मत ज्येष्ठ भारतीय पारंपारिक कला विद्वान डाॅ.सुधाकर चव्हाण यांनी मांडले.
ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फाईन अँड अप्लाइड आर्टस् अभ्यासक्रमाअंतर्गत इंडियन ट्रेडिशनल स्टडीज(आयटीएस) या विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या चित्रकला व छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. ज्योती ढाकणे-कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, विभागाचे अधिष्ठाता डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.आनंद बेल्हे, प्रा.तुषार पंके, शिलकुमार कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्कूल ऑफ फाईन अँड अप्लाइड आर्टसच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविध ठिकाणी जाऊन भारतीय पारंपरिक कला शिकण्याचा, तसेच जवळून अनुभवण्याचा नुकताच आस्वाद घेतला. यामध्ये मुख्यतः भुज-गुजरात, भिलवाडा- राजस्थान, खजुराहो – मध्यप्रदेश ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकारांचे अभ्यासवर्ग आयोजित केले गेले होते. विद्यार्थ्यांनी भुज कच्छ येथे केलेले रोगन कला, लिपन कला, लेदर कला, पोटरी कला, अजरक प्रिंट, भिलवाडा येथे केलेले फड कला आणि तसेच खजुराहो येथील मंदिरांचे प्रत्यक्ष केलेले वेगवेगळ्या माध्यमातील चित्रण यांचा अंतर्भाव या प्रदर्शनात करण्यात आला होता.
१५० पेक्षा जास्त सहभागी विद्यार्थ्यांनी मिळून २५० पेक्षा रेखाटलेल्या चित्रांच्या या सुंदर प्रदर्शनाला विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. त्यामुळे, पुणे शहरातील कला रसिकांसाठी लवकरच मध्यवर्ती भागात या प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.