सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या गणरायाला विद्यार्थी, शिक्षकांनी जड अंत:करणाने दिला निरोप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – टाळ मृदंगाचा गजर, लेझीम, लाठीकाठी, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, विविध कसरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या गणरायाला विद्यार्थी, शिक्षकांनी जड अंत:करणाने निरोप दिला.
गणरायाला निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी जुनी सांगवीतून बाप्पाची मिरवणूक काढली. ही विसर्जन मिरवणूक शितोळेनगर, गजानन महाराज मंदिर, संविधान चौकामार्गे अहिल्याबाई होळकर घाटावर आली. गणपतीची आरती करून गणरायाला जड अंतःकरणाने निरोप दिला. दरम्यान, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. आकर्षक फुलांची सजावट, विद्यार्थ्यांचा पांढरा ड्रेस कोड नागरिकांचे लक्ष आकर्षून घेत होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी बालचमुंच्या कसरती, लेझीम पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. शिक्षिकांनी फुगड्यांचे फेर धरले होते.
विद्यार्थ्यांचे मर्दानी खेळ, लाठी-काठी, टाळपथक, लेझिम, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य हे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. मागील सात दिवसांपासून शाळेत गणेशोत्सवाची धूम असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
विसर्जन मिरवणुकीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, उद्योजक अजय शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, लिटल फ्लॉवर प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, प्रिती पाटील, उदय फडतरे, भटू शिंदे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.