ताज्या घडामोडीजाहिरात विभाग
“कुटुंबसंस्था हा हिंदू संस्कृतीचा पाया!” – ॲड. सदानंद फडके
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “कुटुंबसंस्था हा हिंदू संस्कृतीचा पाया आहे!” असे विचार ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सदानंद तथा नंदू फडके यांनी पुणे येथे व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद स्थापनेच्या षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, विधी प्रकोष्ट संचलित श्रीराम जानकी मोफत कौटुंबिक समुपदेशन सेवा केंद्राचे उद्घाटन करताना ॲड. फडके बोलत होते. धर्माचार्य डॉ. सुभाषमहाराज गेठे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, उपाध्यक्ष माधवी संशी, सी ए अभय माटे, ॲड. प्रशांत यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. सदानंद फडके पुढे म्हणाले की, “विश्व हिंदू परिषदेने आज खर्या अर्थाने कुटुंबसंस्थेसाठी मोठे विधायक कार्य केले आहे. या समुपदेशन केंद्राचे नाव ‘गौरीशंकर’ असे जास्त सयुक्तिक ठरले असते; कारण प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचा त्याग अत्युच्च पातळीवरचा आहे. कुटुंबसंस्कृती या गाभ्यावरती हिंदू संस्कृती विराजमान झाली आहे. त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक आक्रमणे आपण परतावून लावली. आहार, निद्रा, भय, मैथुन या चार घटकांसोबत विवेक हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे माणूस हा पशूपेक्षा वेगळा ठरतो. मतभेदावर मनोमिलन हा उत्तम उपाय आहे!”
डॉ. सुभाषमहाराज गेठे यांनी आपल्या आशीर्वचनपर मनोगतातून, “कोणतीही संस्था विशिष्ट विचार अन् ध्येयाने निर्माण केली जाते. कुटुंबसंस्थेत मात्र आपण जन्माला येतो; आणि मृत्यू येईपर्यंत त्या कुटुंबसंस्थेचा एक अविभाज्य घटक असतो. दोषापनयन अन् गुणाधान या दोन तत्त्वांनी कुटुंबसंस्कार केले जातात. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ अथवा कोणत्याही अवस्थेतील व्यक्तीला कुटुंबसंस्थेचा आधार घ्यावाच लागतो!” असे मत मांडले.
किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. ॲड. शैलेश भावसार यांनी स्वागत केले. ॲड. महेश सोनवणे, अथर्व गोरडे, ॲड. अक्षय भालेराव, ॲड. आशिष गोरडे, ॲड. ऋषिकेश शर्मा, ॲड. सुशांत गोरडे यांनी संयोजन केले. ॲड. संकेत राव यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सोहम यादव यांनी आभार मानले.