चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

ई-प्रशासन : पीसीएमसी स्मार्ट सारथी प्रकल्पाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Spread the love

 

मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आयुक्त शेखर सिंह यांनी स्वीकारला पुरस्कार

महापालिकेचा प्रकल्प ठरतोय देशासाठी रोल मॉडेल

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या “पीसीएमसी स्मार्ट सारथी” या प्रकल्पाला केंद्र शासनाचा ‘ई-गव्हर्नन्स स्कीम २०२३-२४’ अंतर्गत डिस्ट्रीक्ट लेव्हल इनिशिएटीव्ह्ज इन ई-गव्हर्नन्स’(ई-प्रशासनामध्ये जिल्हास्तरीय उपक्रम) या श्रेणीमध्ये सिल्व्हर पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, अंकित भार्गव उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (डीएआरपीजी), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय) आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने दि. ३ व ४ सप्टेंबर, २०२४ रोजी मुंबई येथे २७ वी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. सदर पुरस्कार सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह संपूर्ण देशभरातून पाचशेपेक्षा जास्त संस्थांनी सहभाग नोंदविला. प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यामुळे महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महापालिकेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये नागरिकांना ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करून देणारे पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅप्लिकेशन, दोन वर्षांमध्ये मिळकत कर संकलनामध्ये ५९% वाढ करणारा प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम आणि आकडेवारीवर आधारित निर्णय घेण्यासाठी राबविण्यात येणारा सिटीझन हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन (सीएचडीसी) या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे नागरिकांना सेवासुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यक्षमता वाढली आहे. तसेच, कर संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदर पुरस्कार मिळाल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या नावलौकिकामध्ये भर पडली असून शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button