
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेत धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पिंपरीत भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोरवाडी मेट्रो स्टेशनजवळ आयोजित या शिबिराचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि शिवरुद्र प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात पहिल्याच दिवशी २०० हून अधिक रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कष्टकरी नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या हस्ते शत्रुघ्न (बापू) काटे यांचा संत तुकाराम महाराजांची पगडी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता नागरिकांना सुरक्षित प्रवास देणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. या कष्टकरी बांधवांच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. राजकारणाचा उपयोग हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी झाला पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “या शिबिराच्या माध्यमातून अनेक चालक बांधवांना वेळेवर आरोग्य तपासणी, उपचार आणि मोफत चष्मे मिळणार आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, MNGL आणि शिवरुद्र प्रतिष्ठानचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”
शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून डोळ्यांची तपासणी, रंग आंधळेपणा तपासणी, मोतीबिंदू तपासणी, नंबर तपासणी तसेच रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. गरजू चालकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, “असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये महिनाभर विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.”
युवा नेते शुभम कांबळे म्हणाले, “रिक्षा चालकांना सतत धूळ, प्रदूषण आणि तणावाचा सामना करावा लागतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.”
या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे पदाधिकारी, शिवरुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि विविध मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्याम मोरे, उमेश पवार, जयेश गायकवाड, महेश शिंदे, वैभव सरोदे, गणेश नवगिरे, मल्लेश मंत्री, प्रकाश मकासरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



