
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग, काँग्रेसच्या विचारांप्रती असलेली निष्ठा आणि समाजाभिमुख कार्याची जाणीव यामुळे सौरभ शिंदे यांची राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI)च्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, पुणे जिल्हाध्यक्ष अभिजीत गोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
लहानपणापासूनच काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी प्रेरित असलेले सौरभ शिंदे यांनी विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या प्रश्नांवर संघटित पद्धतीने लढा देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. नव्या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्याची आणि संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सौरभ शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नाही. ते वारकरी परंपरेत वाढलेले असून संत साहित्य, अध्यात्म आणि समाजसेवा यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर स्पष्टपणे दिसून येतो. दरवर्षी ते पायी पंढरपूर वारीत सहभागी होतात. तसेच महाराष्ट्रातील विविध संतांच्या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन संतांच्या चरणी मस्तक ठेवत वारकरी सेवेत सहभागी होतात.
राजकीय विचारांची बांधिलकी आणि वारकरी संस्कारांची मूल्ये यांचा सुंदर संगम असलेले सौरभ शिंदे यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून विद्यार्थी चळवळीला त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि रोजगाराशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे आणि विद्यार्थी चळवळ अधिक सक्षम करणे हेच आपल्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. माझ्या जीवनातील खरी प्रेरणा आणि ऊर्जा ही ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा आणि संत वाङ्मयातून मिळाली. समाजासाठी काम करण्याची ताकद आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील राहण्याची शिकवण मला संत परंपरेतूनच मिळाली आहे.
– सौरभ शिंदे, पिंपरी-चिंचवड शहर शहराध्यक्ष, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या


