– स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने कार्याचा सन्मान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना आमदार लांडगे यांनी हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत गौरवाचा असल्याचे सांगितले. “ज्या महापुरुषांच्या विचारांनी देशाला दिशा दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ जपण्याचा संकल्प आम्ही केला आहे, अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रखर राष्ट्रभक्ती, हिंदुत्वनिष्ठ विचार आणि राष्ट्रनिर्माणासाठी अविरत कार्य करणाऱ्यांना ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार भाजपा नेते, आमदार महेश लांडगे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात आमदार लांडगे यांनी पुरस्कार स्वीकारताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असणाऱ्या ‘विकासाभिमुख हिंदुत्वाचा’ विचार जपण्याचा संकल्प व निर्धार व्यक्त केला. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना देव देश अन धर्मरक्षणासोबतच विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यरत आहोत असेही त्यांनी सांगितले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने पुरस्कार मिळावा, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना असते. मात्र, आपल्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा बहुमान मिळणे हे आपण आपले भाग्य समजतो, असे सांगत आमदार लांडगे यांनी ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आणि आपण त्यांचे आजन्म ऋणी असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थित लाभली त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ब्राम्हण जागृती सेवा संघांचे अध्यक्ष राजन लोणकर, संस्थापक अंकित काणे, रोहन जोशी आणि संघटनेचे पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आमदार महेश लांडगे यांनी प्रखर राष्ट्रभक्त, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भावपूर्ण अभिवादन केले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. देव, देश आणि धर्मासाठी आपल्या संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहिले. त्यांच्या विचारांनीच स्वातंत्र्य चळवळ अधिक बळकट झाली आणि अखंड भारताची संकल्पना राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या मनात रुजली.
“स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना स्वातंत्र्यवीरांना अभिप्रेत असलेले विकासाभिमुख हिंदुत्व जपण्याची जबाबदारी आणखी वाढल्याची जाणीव झाली. देव, देश, धर्म आणि संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प आम्ही पुन्हा एकदा केला आहे. भविष्यातही विकास आणि हिंदुत्व यांचा समन्वय साधत काम करत राहणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा,

