प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा; युवक, महिला आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याचा निर्धार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे शहर काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही नियुक्ती जाहीर केली. बनसोडे यांच्या निवडीचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक आणि राजकीय स्तरांतून स्वागत होत आहे.
नरेंद्र बनसोडे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली असून, शहरातील विविध सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या अडचणी तसेच युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. पक्षाशी निष्ठा आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या नेतृत्वामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नरेंद्र बनसोडे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील प्रलंबित नागरी प्रश्न सोडवण्यासाठी आणि काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी सर्व घटकांना एकत्र आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बनसोडे यांच्या नियुक्तीनंतर शहर काँग्रेसमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

