पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठा निर्णय घेत चेतन पवार यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्थानिक स्तरावर एकमेकांविरोधात उभे असले, तरी राज्य पातळीवर काही ठिकाणी सत्तेत एकत्र असल्याने विरोधाची धार कमी झाल्याची टीका वारंवार होत आहे. अशा परिस्थितीत चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहरात ठोस आणि स्पष्ट विरोधी भूमिका मांडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चेतन पवार यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांनी युवासेना शहरप्रमुख म्हणून काम करताना संघटन बळकट करण्यासाठी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘मातोश्री’वरूनच त्यांच्यावर शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना चेतन पवार म्हणाले, “पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध योजना राबविणार असून तळागाळात पक्षाची विचारधारा रुजवण्यावर भर देणार आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवू. सत्तेत आणि विरोधात असलेले पक्ष राज्यात एकत्र असल्याने त्यांच्या विरोधाची धार कमी झाली आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्षच शहरात खऱ्या अर्थाने प्रभावी विरोधकाची भूमिका बजावेल.”
चेतन पवार यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

